नवशी
esakal January 17, 2026 08:45 AM

rat१५p४.jpg-
P२६O१७९१३
दापोली-खेड मार्गावरील नवशी पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी स्लॅबचा अर्धा भाग तोडण्यात आला असून, उर्वरित अर्ध्या भागाच्या कडेला केवळ पत्रा व लोखंडी सळीच्या आधारे तात्पुरते संरक्षण करण्यात आले आहे.
----
नवशी फाटा पूल वाहतुकीस धोकादायक
वाहनचालकांमध्ये नाराजी; तोडलेल्या भागाला लोखंडी सळीचा आधार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ ः खेड–दापोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व खडीकरणाचे काम वर्षभर सुरू आहे. या मार्गावरील नवशी फाटा येथील पूल वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे. पुलाचे रूंदीकरण करण्यासाठी स्लॅबचा अर्धा भाग तोडण्यात आला असून, उर्वरित अर्ध्या भागाच्या कडेला केवळ पत्रा व लोखंडी सळीच्या आधारे तात्पुरते संरक्षण करण्यात आले आहे; मात्र ही व्यवस्था अपुरी व अपघाताला आमंत्रण देणारी आहे, अशा प्रतिक्रिया वाहनचालकांमधून व्यक्त होत आहेत.
दापोली तालुका हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून, राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांनी येथे येतात. कोकणातील अरुंद व वळणदार रस्त्यांचा अंदाज नसल्याने अनेक वाहनचालक वेगाने वाहन चालवतात. अशा परिस्थितीत नवशी फाट्यावरील पुलावर लावलेल्या पत्र्याला वाहनाची धडक बसल्यास ते वाहन थेट सुमारे २५ ते ३० फूट खोल नदीपात्रात कोसळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यामुळे गंभीर अपघात व जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अभियंतेही प्रवास करतात; मात्र त्यांच्या ही गोष्ट लक्षात का येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
------
चौकट
सुरक्षित उपाययोजना करा
अपघात टाळण्यासाठी बॅरिकेटस्, मजबूत रेलिंग, योग्य दिशादर्शक फलक व रात्रीसाठी प्रतिबिंबित दिवे बसवणे आवश्यक आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी तत्काळ सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.