बविआच्या दिग्गजांना धक्का
वसई-विरारमध्ये माजी उपमहापौर, सभापतींसह अनेकांचा पराभव
विरार, ता. १६ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या निवडणूक निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. बहुजन विकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या नेत्यांचा पराभव हा या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
या निवडणुकीत माजी उपमहापौर रूपेश जाधव यांना अपेक्षित यश मिळाले नाही. संघटनात्मक ताकद असूनही मतदारांचा कौल त्यांच्या विरोधात गेला. तसेच माजी सभापती रुंदेश पाटील यांचाही पराभव झाला आहे. त्यांचा गड मानल्या जाणाऱ्या प्रभागात मतदारांनी वेगळा निर्णय दिला. विशेष म्हणजे, माजी सभापती तसेच बविआप्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे चुलत बंधू पंकज ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ठाकूर कुटुंबासाठी हा निकाल राजकीय दृष्टिकोनातून मोठा धक्का मानला जात आहे.
याशिवाय, माजी महापौर राजीव पाटील यांचे भाचे हार्दिक राऊत यांनाही मतदारांचा पाठिंबा मिळाला नाही. त्यांचा पराभव झाला आहे. माजी स्थायी समिती सभापती, तसेच शिवसेनेचे नेते सुदेश चौधरी यांचा पराभव हा विशेष लक्षवेधी ठरला आहे. या निकालामुळे शिवसेनेच्या स्थानिक राजकारणालाही मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. वसई-विरारच्या राजकारणात बहुचर्चेचा विषय ठरलेल्या धनंजय गावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या मिलनामुळे गावडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता; मात्र या निवडणुकीत मतदारांनी गावडे यांना नाकारले आहे. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या निवडणुकीत स्थानिक प्रश्न, अपूर्ण विकासकामे, नागरी सुविधांबाबतची नाराजी आणि बदलाची अपेक्षा हे घटक निर्णायक ठरले. अनेक प्रभागांत नव्या चेहऱ्यांना संधी देत मतदारांनी प्रस्थापित नेत्यांना घरी बसवले.