उमेश झिरपे
गढवाल हिमालय.. अजस्त्र अन् भव्य. येथील हिमशिखरं अगदी रांगडी. या शिखरांच्या सान्निध्यात गेल्या पाच दशकांत कित्येक दिवस घालवले. गेल्या चार वर्षांत तर माउंट मेरू व इतर मोहिमांमुळे दरवर्षी जाणं झालं, एकदा नव्हे अनेकदा. प्रत्येकी वेळी इथं गेलं की गोमुखचं दर्शन हे ठरलेलंच. गंगा नदीचे उगमस्थान व गंगोत्री हिमनदी व भागीरथी नदीला जोडणारा दुआ. मागच्या वेळी जेव्हा या गोमुखजवळ उभा राहिलो, तेव्हा पुन्हा एकदा काळजात धस्स झालं. इथं आटणारी हिमनदी येणाऱ्या भीषण भविष्यकाळाची जणू नांदीच देत होती. गेल्या चार दशकांत तब्बल १-२ किलोमीटरपर्यंत ही हिमनदी आकुंचन पावली होती. ८०च्या दशकात जिथं सर्वदूर पसरलेला हिम दिसायचा, तिथं आज फूटभर उंच गवत होतं. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो, अनुभवत होतो.
आपल्याला नदी ही खूप जवळची आहे. मानवजातीचं जडणघडणच जणू नद्यांच्या सान्निध्यात झालं आहे. रोजच्या जीवनामध्ये नद्यांचं महत्त्व आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूसदेखील नदीविषयी आपुलकी राखून असतो. त्यामुळे नद्यांचं काही बरं-वाईट होत असेल, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यावर चर्चा झडते, विषय केंद्रस्थानी राहतो. त्यावर उपाययोजना, ‘नदी बचाव’सारखे उपक्रम यांतूनच उभे राहतात. हिमनदी मात्र यांपासून अलिप्त राहते, जणू काही तिला कोणी वालीच नाही. पण.. हिमनद्या आहेत, म्हणूनच नद्या आहेत.. हे कुठेतरी दुर्लक्षितच राहतं.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा हिमनद्यांवर परिणाम (परिणामी मानवी अस्तित्वावर होणारा परिणाम, जो आपण दुर्लक्षित करत आहोत) अन् दूर दुर्गम भागांत, अनवट प्रदेशांत असलेलं अस्तित्व यामुळे होणारे दुर्लक्ष असे दोन कंगोरे एकत्र करून यावर काहीतरी करायला हवं, यांविषयी माझ्या मनात विचारचक्र गेल्या काही वर्षांत नेहमीच चालू होतं. मला नेहमी वाटतं, प्रबोधन अन् कृती या दोहोंना तेव्हाच अर्थ येतो, जेव्हा त्याविषयी ‘जाण अन् जाणीव’ निर्माण होते. ज्याला आपण इंग्रजीमध्ये अवेअरनेस अँड रियालायझेशन असं म्हणतो. एक गिर्यारोहक म्हणून हिमनदीची विविधांगी जाण करून देणं ही माझी जबाबदारी आहे, असं मला वाटतं.
Premium|Vitthal Bhakti Tradition : संत परंपरेत विठ्ठलभक्तीचे महत्त्व; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभ्यासहिमनदी म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर फक्त ‘बर्फाचा अथवा हिमाचा साठा’ इतकं सोपं नाही. हजारो वर्षांपासून पडणाऱ्या हिमकणांनी, हिमाच्या थरांनी, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीनं आणि काळाच्या अथांग प्रवासात तयार झालेला हा जिवंत, वाहता प्रवाह म्हणजे हिमनदी. ती डोंगर उतरत, दरींमधून वळणं घेत, खडकांना कुरतडत, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपली ओळख निर्माण करते. तिचा वेग माणसाच्या नजरेला जाणवत नाही, पण तिचा प्रभाव संपूर्ण खंडांच्या भूगोलावर उमटतो. जगात सुमारे दोन कोटी चौ. किलोमीटर क्षेत्रफळावर हिमनद्या पसरलेल्या आहेत. हिमालय, अँडीज, आल्प्स, अलास्का आणि अंटार्क्टिका हे सारे प्रदेश तिच्या अस्तित्वाने जिवंत आहेत. भारतामध्ये, विशेषतः हिमालयात, सुमारे १० हजारपेक्षा अधिक हिमनद्या आहेत. या हिमनद्या -गंगोत्री, सियाचिन, झेमू, पिंडारी, मिलम- या केवळ भौगोलिक वैशिष्ट्ये नाहीत; त्या आपल्या संस्कृती, धर्म आणि जीवनाच्या प्रवाहाचं मूळ आहेत. गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या जन्मस्थानी हिमनदी आहे. म्हणजेच, भारताच्या जलप्रवाहाचा जन्म हिमांतून होतो. हीच हिमाची नदी पुढे नदीत रूपांतरित होते व शेतीला पाणी देते, पिण्याचं पाणी पुरवते आणि संपूर्ण भारतीय जीवनसंस्कृतीला आधार देते. हिमनदी ही त्यामुळे फक्त भौगोलिक घटक नाही; ती आपल्या जीवनाची अदृश्य पण शाश्वत नाडी आहे. मात्र गेल्या काही दशकांत या नाडीत थरथर निर्माण झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. संशोधन सांगतं, गेल्या ५० वर्षांत हिमालयातील सुमारे २० टक्के हिम वितळून गेला आहे. याचा परिणाम नद्यांच्या प्रवाहावर, हवामानाच्या चक्रावर आणि थेट आपल्या जीवनावर होत आहे. जे प्रदेश हजारो वर्षं गोठलेल्या शांततेत होते, तिथे आता तळी तयार होत आहेत, फ्लॅश फ्लड्स वाढत आहेत. गंगोत्री हिमनदी दरवर्षी जवळपास २० मीटरने मागे सरकत आहे आणि हा आकडा केवळ वैज्ञानिक नोंद नाही, तर चेतावणी आहे.
हिमालयात प्रत्येक मोहिमेत हिमनदी म्हणजे एक नवं आव्हान. ती सकाळी वेगळी असते, दुपारी वेगळी आणि रात्री तर अगदी दुसऱ्या रूपात बदलते. खुम्बू आईसफॉलसारख्या ठिकाणी, जिथं २०१४ मध्ये एका क्षणात १६ शेर्पा दगड-बर्फाखाली गाडले गेले, तिथं माणूस आपली क्षुद्रता जाणतो. २०१९ मध्ये गिरिप्रेमींची कांचनजुंगा मोहीम, जिथं हिमनदी ओलांडून बेस कॅम्प गाठणारी ती एकमेव टीम ठरली, त्या अनुभवांनी या प्रवाहाचं सामर्थ्य आणि सौंदर्य दोन्ही शिकवलं. २०२३च्या मेरू मोहिमेत कीर्ती बमक हिमनदीवरचे तासन्तास चाललेले प्रयत्न आणि अवघड क्रेव्हास रेस्क्यू हे प्रसंग अजूनही मनात कोरलेले आहेत. हे अनुभव फक्त साहसाचे नाहीत; ते निसर्गाशी संवाद साधण्याचे क्षण आहेत.
हिमनदी माणसाला थांबायला शिकवते. ती सांगते, ‘मी हळूहळू वाहते, पण कायम वाहते.’ हा संदेश केवळ निसर्गशास्त्राचा नाही, तर जीवनाचा आहे. आपण वेगाने जगतो, पण टिकणं विसरतो. हिमनदी मात्र हजारो वर्षे आपल्या स्थिरतेने, शांततेने आणि सातत्याने जगाला शिकवत असते, सहनशीलता आणि संयम हीच खरी शक्ती. हिमनद्या केवळ वैज्ञानिक किंवा साहसी दृष्टिकोनातून पाहायच्या नाहीत, तर त्या मानवी संस्कृतीचा भाग आहेत. गंगोत्रीचा उगम पाहताना डोळ्यात पाणी येतं, कारण तिथून वाहणारा प्रत्येक थेंब म्हणजे आयुष्याचा प्रतीकात्मक प्रवाह. केदारनाथ, बद्रीनाथ, कैलास-मानसरोवर या सर्व स्थळांमागे हिमनदींचं योगदान आहे. धार्मिकतेतून, अध्यात्मातून आणि पर्यावरणातून हिमनदी एकाच वेळी दैवी आणि वैज्ञानिक भासते.
भविष्यात या हिमनद्या टिकतील का, हा प्रश्न आता केवळ संशोधनाचा नाही, तर मानवतेचा आहे. हिमनद्या वितळत राहिल्या तर नद्या आटतील, शेती कोमेजेल आणि संपूर्ण हवामानच बदलून जाईल. हिमाच्या त्या पांढऱ्या जगात पाऊल ठेवताना आपण निसर्गाच्या सर्वात संवेदनशील अवयवाला स्पर्श करतो आहोत. हिमनदी आपल्याला केवळ साहस नाही तर जबाबदारीही शिकवते. ती सांगते, ‘मी जिवंत आहे, पण तू मला जपशील तरच तुझं जग जिवंत राहील.’
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आणि गिरिप्रेमी आहेत.)