प्रस्थापितांना दणका
माजी महापौरांसह १६ माजी नगरसेवक पराभूत
डोंबिवली, ता. १८ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी जुन्या चेहऱ्यांना नाकारत बदलाचा स्पष्ट कौल दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून पालिकेत वर्चस्व गाजवणाऱ्या १६ माजी नगरसेवकांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये माजी महापौर वैजयंती गुजर-घोलप यांचा झालेला पराभव हा या निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर ठरला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या वैजयंती गुजर-घोलप यांचा ठाकरे गटाच्या नवोदित उमेदवार अपर्णा भोईर यांनी ३,७५५ मतांनी पराभव केला. २० वर्षे नगरसेविका आणि महापौरपद भूषवलेल्या नेत्याचा हा पराभव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. तर संजय पाटील, प्रकाश भोईर, कस्तुरी देसाई, रवि पाटील, नितीन पाटील, रंजना पाटील, शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि वंदना गिध यांसारख्या अनुभवी माजी नगरसेवकांना मतदारांनी नाकारले आहे. कल्याण पूर्वेतील एका प्रभागात उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ या पर्यायाला अधिक मते मिळाली. मतदारांनी कुणालाही निवडून न देण्याचा घेतलेला हा पवित्रा राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाचा इशारा मानला जात आहे.
सर्वाधिक मताधिक्य
डोंबिवलीतील देवीचा पाडा (प्रभाग २२) मधून मनसेचे अभियंता उमेदवार संदेश पाटील यांनी १८,५४६ मते मिळवत शहरात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम नोंदवला.
अटीतटीच्या लढती :
काही प्रभागांमध्ये विजय-पराभवाचे अंतर अत्यंत अल्प होते, ज्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली होती.
- नीलेश खंबायत (ठाकरे गट) हे अवघ्या सहा मतांनी विजयी
- नमिता पाटील या आठ मतांनी विजयी
- काँग्रेसच्या समिना शेख यांचा ४८ मतांनी विजय झाला.
- ठाकरे गटाचे विशाल गारवे १७२ मतांनी विजयी झाले.