भारतीय बोलपटांचा पहिला सिंगिंग स्टार आणि एक युगकर्ता गायक अशी कुंदनलाल सैगल यांची एकेकाळी भारदस्त ओळख होती. आज कालौघात ही ओळख धूसर होत चालली आहे. म्हणूनच फिल्म्स डिव्हिजनने केलेल्या के. एल. सैगल या लघुपटाकडे वळून पाहिलं पाहिजे.
हृदयातली रणे जाहली क्षणा मधे शांत आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात्र अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, घडीभर जागव रे आमुची मानवता ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहात हिंदी चित्रपटसृष्टीतील आद्य गायक नट कुंदनलाल सैगल यांच्यावर १९४०मध्ये कविता केली होती, त्यातल्या या अखेरच्या चार ओळी. कुसुमाग्रजांनी जेव्हा ही कविता लिहिली तेव्हा सैगल तेव्हा हयात होते. या महान कलाकाराने भाषा प्रांत ओलांडून देशातील जनसामान्यांना किती भारून टाकलं होतं, त्याचं ही कविता एक अनोखं प्रतीक आहे. भारतीय बोलपटांचा पहिला सिंगिंग स्टार आणि एक युगकर्ता गायक अशी कुंदनलाल सैगल यांची एकेकाळी भारदस्त ओळख होती. आज कालौघात ही ओळख धूसर होत चालली आहे. म्हणूनच फिल्म्स डिव्हिजनने केलेल्या के. एल. सैगल या लघुपटाकडे वळून पाहिलं पाहिजे. १८ जानेवारी हा सैगल यांचा स्मृतीदिन.
१९४७ मध्ये सैगल यांचा वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे १९५५ मध्ये त्यांनी जिथे सर्वात जास्त काम केलं, त्या न्यू थिएटरने अमर सैगल हा त्यांची जीवनकथा सांगणारा एक चित्रपटच काढला होता. भारतातील ही पहिली बायोपिक म्हणता येईल. अकाली देवाघरी गेलेल्या सैगलना त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक यांनी पडद्यावर चित्रपटरूपाने वाहिलेली ही आगळीवेगळी श्रद्धांजली होती.
पुढे २००६मध्ये फिल्म्स डिव्हिजनने सैगल यांच्यावर लघुपट बनवला तेव्हा सैगल यांच्या निधनाला ६० वर्षे होत आली होती. मध्ये बराच काळ गेल्यामुळे काही पाऊलखुणा मिटून गेल्या. तरीसुद्धा या लघुपटाचे दिग्दर्शक यश चौधरी ६५ मिनिटांत सैगलयुग पडद्यावर साकारण्यात सफल झाले, असा लघुपट पाहिल्यावर निश्चित वाटतं. लेखक अभ्यासक प्राण नेवले यांनी लिहिलेल्या के. एल. सैगल यांच्या जीवनचरित्राचा आधार पटकथेसाठी घेतला आहे.
Premium|Indian Cinema History : ‘सारंगा, तेरी याद में नैन हुए बैचैन...’लघुपटाच्या सुरुवातीलाच सैगल कोण आहेत, असा प्रश्न तरुण मुलांना विचारला जातो तेव्हा गोंधळलेले निरुत्तर चेहेरे दिसतात. जगातील सगळ्यात जास्त चित्रपट बनणारा देश अशी कीर्ती असलेल्या आपल्या देशात काही दशकं उलटल्यावर तरुणाईला आद्य आणि महान गायक नट माहीत नाही, या नकारात्मक विधानाने लघुपटाची सुरुवात होते; पण त्याच वेळी या लघुपटाचं महत्त्वही अधोरेखित होतं. लघुपटात मान्यवरांची मनोगतं आहेत. तिथे विख्यात दिग्दर्शक मृणाल सेन आणि श्याम बेनेगल या नकारात्मक विचारांची मीमांसा करताना भारतीय समाजाच्या सिनेसाक्षरतेबद्दल आणि एकूण इतिहासाकडे डोळसपणे न पाहण्याच्या वृत्तीचा मार्मिक उल्लेख करतात.
कुंदनलाल सैगल यांच्या अत्यंत गाजलेल्या गीतांमधून लघुपट पुढे सरकतो. सैगल यांचं जम्मूमधील बालपण उलगडतं. बालपणाची ही कथा सुंदर स्केचस आणि काही दुर्मिळ फोटोंच्या माध्यमातून पुढे सरकते. सैगलच्या जीवनावर त्यांची आई केसरबाई यांचा विलक्षण परिणाम होता, हे इथे लक्षात येतं. आईबरोबर भजन, कीर्तन, शब्द ऐकायला जाणाऱ्या, रामलीलेत सीतेची भूमिका करणाऱ्या गोड गळ्याच्या छोट्या सैगलची सुंदर रेखाचित्र टॉम ऑल्टर यांच्या इंग्रजी निवेदनामागे इथे पडद्यावर दिसतात.
पंजाबी लोकगीत, वारिस शाह यांची लोकसंस्कृतीतील गीतं याचा अमीट ठसा सैगलवर कसा उमटला आणि गाणं भावपूर्ण कसं झालं, ते थोडक्यात समजतं. संगीत कलेविषयी पूर्ण समर्पण आणि खोलवर उमटलेला आंतरिक स्वर याची प्रचिती येते. भावनेत भिजलेली सैगल गीतं मनात रुंजी घालू लागतात. जम्मू, जालंधर, कोलकाता असा सैगल यांचा प्रवास, त्यांनी भारतातील श्रेष्ठ गवयांची केलेली श्रवणभक्ती याची संगती हा लघुपट पाहताना लागते. सैगल यांनी ज्यांची श्रवणभक्ती केली, त्यात उस्ताद अब्दुल करीम खान, उस्ताद फैयाज खान यांच्याबरोबर बालगंधर्व यांचंही छायाचित्र दिसतं. गंधर्व गायकीचा प्रभाव सैगल यांच्यापर्यंत पोहोचला होता, याचा आनंद वाटतो. सैगल जिथे जिथे राहिले त्या गावात आणि मुंबई, कोलकातासारख्या महानगरात त्यांचं वास्तव्य झालेल्या घर परिसरात हा लघुपट आपल्याला घेऊन जातो.
सैगल यांचे सहकारी, सहअध्यायी केव्हाच जग सोडून गेले तरी या सगळ्या दिग्गजांची पुढची पिढी इथे भेटते. आठवणी सांगते. सैगल यांचे नातू परमिंदर चोप्रा आणि सलीम मर्चंट, कोलकात्यात सैगलना पहिली संधी देणारे न्यू थिएटर्सचे बी. एन. सरकार यांचे पुत्र दिलीप सरकार आई-वडिलांकडून ऐकलेल्या सैगल यांच्या आठवणी सांगतात. यातून सैगल याचं अगदी साधं आणि घरेलू व्यक्तित्व लक्षात येतं.
Premium|Juror No.2 Movie Review : उत्तम दिग्दर्शकाचे सूचक भाष्य१९३२ मध्ये कोलकात्यात हिंदुस्तान रेकॉर्ड कंपनीने सैगल यांची ‘झुलना झुलाओ’ ही गैरफिल्मी गीताची पहिली रेकॉर्ड काढली. रेकॉर्डची तडाखेबंद विक्री झाली. के. एल. सैगल या नावाशी यशाचं गणित जोडलं जाऊ शकतं, हे कंपनीला उमगलं. सैगल यांची चित्रपट गीतं, गैरफिल्मी गीतं, भजन, गझल, बंगाली गाणी सगळंच हिंदुस्तान रेकॉर्ड कंपनीने तबकड्यांवर आणलं. हा भाग लघुपटात विस्ताराने येतो. सैगलची गाणी ऐकताना रेकॉर्ड कव्हर, कलात्मक चित्र, पारंपरिक रागमाला चित्र याचे दर्जेदार कोलाज समोर येतात. सैगलनी कोलकात्याला राहून बंगालीवर प्रभुत्व मिळवलं. एकूण ३० बंगाली गाणी गायली. साक्षात रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची बंगाली गीतातली शुद्धता तपासली. हा भाग लघुपटात सुंदर स्केचेसमधून आला आहे. लघुपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर रघू कृष्ण यांचं हे काम सगळ्या आशयाला उंचीवर नेणार आहे. यातील रेखाचित्रांचं श्रेय मनोहर चांदणे यांचं आहे.
सैगल या आख्यायिकेची तेव्हा आणि आजच्या संदर्भातलं महत्त्व सांगणारी मान्यवरांची काही मनोगतं विचार करायला लावतात. दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि विख्यात रेडियो प्रस्तुतकर्ता अमीन सायानी मागच्या शतकातील सर्व लोकप्रिय पार्श्वगायकांवर सैगल यांचा कसा प्रभाव पडला, ते सांगतात. सैगल यांच्या अभिनयापेक्षा गाणं सरस होतं आणि तेच रसिकांनी जास्त लक्षात ठेवलं, अशी नोंद बेनेगल यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक मृणाल सेनही करतात.
प्रसिद्ध निर्माता निर्देशक रामानंद सागर त्या काळात सैगल यांचं वलय किती मोठं होतं, ते सांगतात. अखंड भारतात लाहोर येथे राहत असताना घरातील छज्जे आणि गच्चीवर रात्रीच्या शांततेवेळी सैगल यांचे सूर रेडिओवरून तरंगत यायचे, तो आनंद अपूर्व होता, असं म्हणताना ते भावुक होतात.
लेखक-दिग्दर्शक गुलजार यांना सैगल भूमिकांमधील शोकात्मतेमुळे आणि अजरामर गाण्यांमुळे अधिक स्मरणात राहिले, असं वाटतं. तानसेन, शाहजहान यांच्या प्रमुख भूमिका भारतीय सिनेमात सैगल यांनी पडद्यावर पहिल्यांदा साकारल्यामुळे बालपणापासून सैगल एक लीजंड आहे, हे मनावर ठसलं आहे, असं मनोगतही ते इथे व्यक्त करतात.
सैगल यांची विविध चित्रपट गीतं हा तर या लघुपटाचा गाभा आहे. त्याचा आनंद अर्थातच मोठा आहे. दिग्दर्शक यश चौधरी यांनी मनोगतं आणि गाणी याचा अचूक मेळ घातला आहे.
निवेदन, कलात्मक मांडणी, सुरेल संगीत, चित्रपटातील अभिनय दाखवणारे क्षण यातून भारतातील या आद्यगायक नटाची कथा इथे उभी राहते. या लघुपटाच्या आरंभी सैगल कोण, असा प्रश्न पडलेल्या तरुण पिढीला समर्पक उत्तर देण्यात लघुपट यशस्वी होतो, हे निश्चित.
लघुपट : के. एल. सैगल
अवधी : ६५ मिनिटे
दिग्दर्शक : यश चौधरी
निर्माता : फिल्म्स डिव्हिजन
(लेखिका आकाशवाणीच्या माजी निर्मात्या आणि संगीत अभ्यासक आहेत.)