भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला आतापर्यंत नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. हर्षित हेड कोच गौतम गंभीर याचा मर्जीतला असल्याने त्याला भारतीय संघात वारंवार संधी मिळते, असा आरोप केला जातो. यावरुन हेड कोच गंभीरने नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलंय. मात्र हर्षितने त्याला संघात कामगिरीच्या जोरावर संधी मिळते, हे दाखवून दिलंय. हर्षितची न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत निवड करण्यात आली. हर्षितने न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवलीय. हर्षितने यासह टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.
हर्षितने 18 जानेवारीला इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खास कारनामा केला आहे. हर्षितने न्यूझीलंड विरूद्धच्या या सामन्यात एकूण 3 विकेट्स मिळवल्या. मात्र हर्षितने न्यूझीलंडच्या एका फलंदाजाला आऊट करत खास हॅट्रिक पूर्ण केली. हर्षितने नक्की काय केलंय? जाणून घेऊयात.
हर्षितने न्यूझीलंडला डावातील दुसऱ्याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर झटका दिला. हर्षितने न्यूझीलंडचा ओपनर डेव्हॉन कॉनव्हे याला रोहित शर्मा याच्या हाती 5 धावांवर कॅच आऊट केलं. हर्षितने यासह हॅट्रिक पूर्ण केली. हर्षितची कॉनव्हेला या मालिकेत आऊट करण्याची ही एकूण आणि सलग तिसरी वेळ ठरली. हर्षितने कॉनव्हेला सलग तिसऱ्यांदा आऊट करण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हर्षितने त्याआधी बडोद्यात झालेल्या पहिल्या सामन्यात डेव्हॉनला 56 धावांवर बोल्ड करत मोठी खेळी करण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर हर्षितने राजकोटमधील दुसऱ्या सामन्यातही कॉनव्हेला बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता.
दरम्यान हर्षितने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात एकूण 10 ओव्हर बॉलिंग केली. हर्षितने 3 विकेट्स मिळवल्या. मात्र हर्षित धावा रोखण्यात अपयशी ठरला. हर्षितने 10 ओव्हरमध्ये 8.40 च्या इकॉनमी रेटने एकूण 84 धावा लुटवल्या.
हर्षितकडून कॉनव्हेची सलग तिसऱ्यांदा शिकार
दरम्यान न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतासमोर या मैदानात 338 धावांचं आव्हान ठेवलं आहे. डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स या जोडीने केलेल्या कामगिरीमुळे न्यूझीलंडला 337 धावांपर्यंत मजल मारता आली. डॅरेल-फिलीप्स या दोघांनी 137 आणि 106 धावांची खेळी केली. आता टीम इंडिया विजयी धावा करुन मालिका जिंकते की न्यूझीलंड बाजी मारते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.