नाशिक: पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या घटनेनुसार कोणत्याही विश्वस्तास दोन टर्मनंतर तिसरी टर्म करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सहधर्मादाय आयुक्तांनी दिला. या निर्णयामुळे संस्थान, तसेच कपालेश्वर मंदिरासारख्या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या देवस्थानांवरील विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्यांबाबतचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संस्थानच्या घटनेनुसार एक विश्वस्त जास्तीत जास्त दोन टर्म म्हणजे १२ वर्षेच कार्यरत राहू शकतो. संस्थानवर जिल्हा न्याय दंडाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून, उर्वरित दहा विश्वस्तांची निवड होते. यात तीन विश्वस्त विद्यमान मंडळाकडून, तीन पुजारी वर्गाकडून, तर चार विश्वस्तांची निवड धर्मदाय सहआयुक्त कार्यालयाकडून केली जाते.
फेरफार अर्जांना वैधानिक अधिकार नाही
सहा वर्षांपूर्वी पुजारी वर्गातर्फे उमेश पुजारी यांचे नाव विश्वस्तपदी सुचविण्यात आले होते. मात्र, त्यांनी यापूर्वीच दोन टर्म पूर्ण केल्याने तत्कालीन अध्यक्षांनी त्यांची नियुक्ती नाकारत पर्यायी नाव सुचविण्यास सांगितले होते. त्यानुसार पुजारी वर्गाकडून नरेश पुजारी यांचे नाव देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात उमेश पुजारी यांनी धर्मादाय कार्यालयाकडे एकतर्फी फेरफार (चेंज रिपोर्ट) अर्ज दाखल केला होता.
त्याविरोधात ट्रस्टने सहधर्मादाय आयुक्तांकडे रिव्हिजन अर्ज सादर केला होता. या रिव्हिजन अर्जाचा निकाल देताना सहधर्मादाय आयुक्तांनी पुजारी अथवा अन्य पुजाऱ्यांना फेरफार अर्ज दाखल करण्याचा कोणताही वैधानिक अधिकार नसल्याचे स्पष्ट करीत अर्ज रद्दबातल ठरविला. या निर्णयामुळे कोणत्याही व्यक्तीस तिसऱ्यांदा विश्वस्त म्हणून काम करता येणार नाही, हा नियम अधोरेखित झाला आहे.
Mohan Bhagwat:...तर दहा-बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; छत्रपती संभाजीनगरात प्रबुद्ध नागरिकांशी संवाद!माझी निवड कायदेशीरच : जानोरकर
संस्थानच्या विश्वस्त मंडळावर तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्याचा आरोप असलेले मंदार जानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, सहधर्मादाय आयुक्तांचा निर्णय केवळ उमेश पुजारी यांच्यापुरताच मर्यादित असून, आपली नियुक्ती धर्मादाय आयुक्त कार्यालयाने कायदेशीर प्रक्रियेतूनच केली आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पदसिद्ध अध्यक्ष, विद्यमान विश्वस्त मंडळ आणि न्यायालय कोणती भूमिका घेतात, याकडे भाविकांसह शहराचे लक्ष लागले आहे.