मोहराच्या सुगधांचे मुळशीचा परिसर दरवळला
esakal January 19, 2026 07:45 AM

पौड, ता. १८ : मुळशी तालुक्यात यावर्षी आंब्याच्या झाडांना मोहरामुळे चांगलाच बहर आलाय. मोहोरामुळे आंब्याची हिरवीगार झाडे पिवळसर झाली आहे. या मोहोराच्या गोड, मंद सुगधांने मुळशीचा परिसर दरवळून गेला आहे. या सुगंधाने जंगलातील, शेतातील त्याचप्रमाणे घरासभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे निसर्गाच्या नवलाईचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावलेही मुळशीकडे वळू लागली आहेत.

भाताप्रमाणेच आंबा हे तालुक्यातील महत्त्वाचे पीक आहे. खेचरे बेलावडे पंचक्रोशीत आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मांदेडे गावाला तर आंब्याचे गावच समजले जाते. त्याचप्रमाणे मुठा, कोळवण, माले खोऱ्यात, मुळशी धरण भागातील अनेक गावांमध्ये आंब्याचे उत्पादन होत असते. आंब्यावरच कुटुंबाची उपजीविका भागवली जात असल्याने बळिराजा झाडांची विशेष काळजी घेत असतो. तर पुणे तसेच मुंबईतील खवैये मुळशीतल्या पिकलेल्या आंब्यांची आवर्जून वाट पाहत असतात. हापूस, पायरी, रायवाळ, केशर या जातीच्या आंब्याची तालुक्यात लागवड होत असते.
निसर्गाची अवकृपा झाली नाही तर यावर्षी आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे होईल, असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. गतवर्षी मोहोर चांगल्या प्रमाणात येऊन ढगाळ वातावरणामुळे आंब्याचे फळच आले नाही. त्यामुळे गेल्यावर्षी खूप नुकसान झाले होते. तथापि यावर्षी अद्यापर्यंततरी निसर्गाची कृपा असल्याने हा बहर टिकून राहिला आहे. यंदा मोहोर भरपूर आला आहे. हवामानाने साथ दिली तर आंब्याचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा ओंबळेवाडा येथील स्थानिक शेतकरी श्रीपती गोळे यांनी व्यक्त केली.

भात पिकाप्रमाणे आंबाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उत्पादन आहे. परंतु दरवर्षी वातावरण बदलामुळे हातातोंडचा घास निघून जातो. यावर्षी मोहोर चांगला आलाय. तो असाच टिकून राहिला तर शेतकऱ्याला सुगीचे दिवस येऊ शकतात.
- शत्रुघ्न धुमाळ (मांदेडे, धुमाळवाडी)

04600

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.