आळेफाटा, ता. १८ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सध्या कांदा लागवडीला वेग आला आहे. राजुरी, वडगाव कांदळी, उंचखडक, गुंजाळवाडी, बोरी बुद्रूक साळवाडी, जाधववाडी, भोरवाडी, वडगाव आनंद, पादीरवाडी, वडगाव कांदळी, कोळवाडी, संतवाडी, शिरोली सुलतानपूर या गावांत सध्या दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे हिवाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे.
चालूवर्षी सुरुवातीला कांद्याला बाजारभावच मिळाला नसल्याने या भागातील शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली होती. कारण या भागातील शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा साठवून ठेवला होता. पण वर्ष झाले तरी बाजारभावात वाढ झाली नाही. दरम्यान, साठवून ठेवलेला कांदा पूर्णपणे सडला. त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, पुढील काळात चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने पुन्हा जोमाने कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यग्र आहेत.
दरम्यान, कांदा लागवडीमुळे महिलांना रोजगार मिळत आहे. काही ठिकाणी मजुरांअभावी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांदा लागवडीसाठी महिला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना एका महिलेस ५०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्चात वाढ झाली.
07632