वैद्यकीय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जव्हार, ता. १८ (बातमीदार) : येथील दिव्य विद्यालयात केशव सृष्टी ग्राम स्वास्थ्य आयाम व लायन्स क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबिराचे शनिवारी (ता. १८) आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दिव्य विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा तसेच एमएसकेमधील सुमारे ४५० विद्यार्थ्यांची कुपोषण, ॲनिमिया व सिकलसेल आजारांसाठी सखोल तपासणी करण्यात आली.
या शिबिरात सहा केंद्रांमधील ‘स्वास्थ्य रक्षक दाम्पत्यांनी’ मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची उंची, वजन व हिमोग्लोबिन मोजणी करून त्याची नोंद ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी पार पाडले. दिवसभर अथक परिश्रम करूनही सर्व दाम्पत्ये, तसेच कार्यक्रम समन्वयक जागृती, सुवर्णा व तुकाराम यांनी कामाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. दिव्यांग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला कोकड यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षक व कर्मचारी, तसेच केंद्रप्रमुख राहुल, एमएसके व केओडब्ल्यूचे शिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. लायन्स क्लब, मुंबईच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. या संपूर्ण उपक्रमाचे मुख्य आधारस्तंभ म्हणून संजय खन्ना यांनी प्रभावी नेतृत्व केले. तसेच जव्हार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय कावळे यांचे वैद्यकीय पथक उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
चौकट
स्वास्थ्य किटचे वाटप
तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला ‘स्वास्थ्य किट’ देण्यात आले. या किटमध्ये एक लिटर पाण्याची बाटली, नॅपकिन, टूथब्रश, कंगवा आदी दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता.