राजगुरुनगर, ता. १८ : इंडियन योगासना स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित तिसरी राष्ट्रीय योगासना स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ ही नुकतीच त्रिवेंद्रम (केरळ) येथे पार पडली. या स्पर्धेत राजगुरुनगर येथील अमृतवेली योग वर्गाच्या योगशिक्षिका रोहिणी ताठे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत देदीप्यमान यश संपादन केले.
ताठे यांनी रिदमिक योगा पेअर व आर्टिस्टिक पेअर या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. तसेच आर्टिस्टिक ग्रुप प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक तर पारंपरिक योगासन प्रकारात चतुर्थ क्रमांक पटकावला. या यशामुळे त्यांनी महाराष्ट्रासह राजगुरुनगरचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल योग क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ताठे यांनी योगाचा प्रसार करण्याचे ध्येय मनात ठेवून आणि समाजाला योगाचा फायदा व्हावा, म्हणून योगवर्ग चालू केले. हे वर्ग चालवत असताना योगासन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. खेलो इंडियामध्येही त्यांनी सहभाग घेतला. पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील राष्ट्रीय पातळीवरील योगस्पर्धेत त्यांनी देशात पाचवा क्रमांक मिळवला. तसेच व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत त्यांनी तिसरी रॅंक पटकाविली होती.