Gold- Silver Price : पोरांची लग्न कशी करायची? चांदी 3 लाखावर, सोनंही आकाशाला भिडलं.. आजचे भाव ऐकून धक्काच बसेल
Tv9 Marathi January 19, 2026 07:45 PM

सोन्या-चांदीच्या दागिन्यांबद्दल सर्वांनाच एक वेगळी उत्सुकता आणि प्रेम असतं. हाता -पायत, गळ्यात एवढंच काय अगदी सोन्याचा दात बसवूनही तो मिरवणारे आपल्याकडे कमी नाही. भारतात सोन्याचे दागिने सर्वात जास्त वापरले जात असतील. पण सध्या सोन्या- चांदीचे भाव जे धाडकन वाढत आहेत, ते पाहून डोक्याला तर झिणझिण्याच येतील. सोने आणि चांदीच्या किमती घसरण्याचे (Gold-Silver Rates) सर्व अंदाज खोटे ठरत असून आणि हे दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडताना दिसत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीच्या किमतींमध्ये इतकी मोठी वाढ झाली की 1 किलो चांदीची किंमत (Silver Price) तब्बल 3 लाख रुपयांच्या पुढे गेली. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने हा टप्पा ओलांडला आहे. तर दुसरीकडे चकाकणारा, पिवळा धातू अर्थात सोन्याच्या किमतीही नवीन उच्चांकावर पोहोचल्या.

चांदीची घोडदौड थांबेचना

चांदीच्या किमती काही थांबण्याचे, कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये चांदीच्या किमती13 हार 553 रुपयांनी वाढल्या आणि पहिल्यांदाच चांदीचे 3 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. 1 किलो चांदीचा नवा ऑल हाय टाइम लेव्हल हाँ 3 लाख 01 हजार 315 रुपये (प्रति किलो) इतक्या किमतीवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवारी, MCX चांदीचा दर प्रति किलोग्रॅम 2 लाख 87 हजार 762 रुपयांवर बंद झाला.

जानेवारीत 65 हजारांनी वाढली चांदी

2025 मध्ये चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर, या वर्षाच्या पहिल्या महिन्यातही चांदीच्या किमती वाढत्याच दिसत आहेत. आज जानेवारीची 19 तारीख आहे, आणि चांदीचा भाव आतापर्यंत 65 हजार 614 रुपयांनी वाढला आहे. 31 डिसेंबर 2026 ला चांदीची किंमत 2 लाख 35 हजार 701 रुपये होती. मात्र आज चांदीचा दर एका किलोसाठी थेट 3 लाख 1 हजार 315 रुपये इतका आहे.

सोन्याचे दरही वाढलेलेच

आता, सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर MCX Gold Rate हाही चांदीप्रमाणे वाढतच चालला आहे. गेल्या आठवड्यात, शुक्रवार, सोन्याचा वायदा भाव प्रति 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळ्यासाठी 1 लाख 42 हजार 517 रुपये इतका होता. तर सोमवारी बाजार उघडातानाच तो 1 लाख 45 हजार 500 या नव्या उच्चांकावर पोहोचला होता. जर आपण या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा आढावा घेतला तर 31 डिसेंबर 2025 रोजी 1 तोळा किंवा 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 35 हजार 804 रुपये होती.त्यामुळे आत्तापर्यंत सोन्याची प्रति तोळा किंमत ही 9 हाजर 696 रुपयांनी महाग झाली आहे.

का चमकतंय सोनं- चांदी ?

सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमागील कारणांबद्दल बोलायचं झालं तर, जागतिक तणाव हे सर्वात महत्त्वाचे कारण मानले जाऊ शकते. ट्रम्पच्या टॅरिफमुळे हे पुन्हा एकदा वाढले आहे आणि अमेरिकेने युरोपीय देशांवरही शुल्क लादले आहे जे ट्रम्पच्या ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या योजनेत अडथळा आणत असल्याचे दिसून येते. यामुळे तणाव आणखी वाढला आहे आणि गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित आश्रयाच्या शोधात सोने-चांदीकडे वळायला सुरुवात केली आहे आणि परिणामी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून चांदीच्या दराने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजारांनी तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 48 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर  चांदीचे दर जीएसटी सह 3 लाख 3 हजार 850 रुपयांवर पोहोचले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.