बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांच्या कथा इतक्या जबरदस्त असतात की त्या अनेकदा पाहू वाटतात. पण अशा काही कथा आहेत, ज्या अधुरी प्रेमकहाणी सारख्या आहेत. ज्यामध्ये प्रेम कहाणी आहे पण त्याचा शेवट खूपच भयंकर असतो.
आम्ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेकांनी दिग्दर्शकांना शेवट बदलण्याचा सल्ला दिला. चित्रपटातील क्लायमॅक्समुळे प्रेक्षक नाराज होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. पण दिग्दर्शकांनी कोणताही बदल न करता मूळ कथेशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी, हा चित्रपट त्या वर्षातील प्रचंड सुपरहिट ठरला.
‘एक दूजे के लिए’ ही एक प्रेमकहाणी नव्हती तर समाजातील भाषिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक भेदभावावर बोट ठेवणारी कथा होती. या चित्रपटाचा परिणाम इतका खोलवर झाला की, त्या काळात काही प्रेमी जोडप्यांनी हा चित्रपट पाहून आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या. ज्यांना आपले मिलन शक्य नाही, असे वाटत होते त्यांच्यासाठी हा चित्रपट वेदनेचा आरसा ठरला.
‘एक दूजे के लिए’ चित्रपटामधील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये कमल हासन आणि रती अग्निहोत्री झळकले होते. हा चित्रपट बालचंदर यांच्या स्वतःच्याच एका तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता.
‘एक दूजे के लिए’ची कथा गोव्यात राहणाऱ्या एका तमिळ मुलगा वासु आणि उत्तर भारतातील मुलगी सपना यांच्या प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाचा शेवट अत्यंत दुःखद होतो. आजही हा चित्रपट प्रेक्षक प्रचंड आवडीने बघतात.