सोमेश्वरनगर - वाणेवाडी (ता. बारामती) येथे ऊस भरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचा अॅक्सल तुटला. त्यामुळे चाक तुटून ट्रॉली क्षणांत पलटी झाली आणि शेजारून चाललेल्या दुचाकीवर तीन-चार टन ऊस कोसळला. शेजारच्या चव्हाणवस्तीवरील ग्रामस्थांनी धावाधाव करत काही मिनिटांतच ऊस बाजूला केला आणि दुचाकीवरील बाप-लेकांना सुखरूप बाहेर काढले. युवराज काशिनाथ भिसे (वय ५०) आणि काशिनाथ गोपाळा भिसे (वय ७०) (दोघेही रा. होळ ता. बारामती) अशी जखमींची नावे आहेत.
वाणेवाडी येथे रविवारी (ता. १८) दुपारी बाराच्या सुमारास ऊसतोड मजुरांचा डंपीग ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २५ ए.एस. ७६६५) ऊस भरलेली ट्रॉली घेऊन सोमेश्वर कारखान्याकडे येत होता. वाणेवाडी- होळ रस्त्यावरील अंबामाता मंदिराजवळच्या चढावर असताना ट्रॉलीचा अॅक्सल तुटला. त्यामुळे ट्रॉलीचे एक चाक निखळले आणि ट्रॉली पलटी होऊन ट्रॉलीतील ऊस वाणेवाडीकडून होळकडे जाणाऱ्या स्प्लेंडर दुकाचीवर पडला.
ट्रॉलीवरील उसावर बसलेले दोन ऊसतोड मजूर बाजूला फेकले गेले. मात्र, दुचाकी आणि त्यावरील दोघे उसाखाली अडकले. प्रवासी तरुण आणि शेजारच्या चव्हाणवस्तीवरील महिला आणि पुरुष त्वरित कोयता, विळा, कुऱ्हाड घेऊन धावले. पटापट ऊस कापून सुरुवातीला दोघांना मोकळे केले. एका तरुणाने तोवर तातडीने सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांना फोन लावला. गायकवाड यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचत जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल केले.
महेश युवराज भिसे म्हणाले, ‘‘चव्हाणवस्ती ग्रामस्थांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. वडील आणि आजोबा सुखरूप आहेत. दुचाकीची मोडतोड झाली आहे. रस्त्याकडेचे लोक ट्रॉलीचे चाक वाकडे-तिकडे फिरत आहे, हे सांगत होते, पण संबंधित चालक जोरात गाणी लावून चालला असल्याने त्याला ऐकू आले नाही. कारखान्याने, मुकादमानेही उपचारासाठी मदत केली.
दरम्यान, नादुरूस्त ट्रॉलीतून ऊसवाहतूक करणाऱ्या आणि स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.