अबू धाबी: मध्य-पूर्व व उत्तर आफ्रिका (MENA) क्षेत्रातील आघाडीच्या सुपर-स्पेशालिटी हेल्थकेअर सेवा प्रदात्या बुर्जील होल्डिंग्सने आयोजित केलेल्या यूएईमधील पहिल्याच प्रकारच्या नेतृत्वात्मक टाउन हॉलमध्ये हजारो फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना AED 15 दशलक्ष (सुमारे 37 कोटी रुपये) इतकी अनपेक्षित आर्थिक मान्यता देण्यात आली. अबू धाबीतील एतिहाद अरेना येथे 8500 हून अधिक कर्मचारी समूहस्तरीय नेतृत्व संबोधनासाठी एकत्र जमले होते. हे संबोधन बुर्जील होल्डिंग्सचे चेअरमन आणि सीईओ डॉ. शमशीर वायलील यांचे होते आणि ते देशातील हेल्थकेअर क्षेत्रातील सर्वात मोठ्या सीईओ-नेतृत्वाखालील कर्मचारी मेळाव्यांपैकी एक ठरले.
संबोधनाच्या मध्यावर कार्यक्रमाला भावनिक वळण मिळाले, जेव्हा फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस नोटिफिकेशन्स मिळू लागले. या संदेशांमध्ये त्यांचा समूहाच्या नव्याने सुरू झालेल्या BurjeelProud ओळख व सन्मान उपक्रमात समावेश झाल्याची पुष्टी होती.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 10000 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, यामध्ये समूहातील जवळपास 85 टक्के नर्सिंग, अलाइड हेल्थ, पेशंट केअर, ऑपरेशन्स आणि सपोर्ट कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही आर्थिक मान्यता भूमिका आणि श्रेणीनुसार साधारणतः अर्ध्या महिन्यापासून एका महिन्याच्या मूलभूत पगाराइतकी असेल.
टाउन हॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना संबोधित करताना डॉ. शमशीर यांनी स्पष्ट केले की हा उपक्रम कोणत्याही अटींशी जोडलेला नाही. ते म्हणाले की, ‘हा कोणत्याही विभागासाठी दिलेला बक्षीस नाही, किंवा कोणत्याही अटींवर आधारित नाही. तुम्ही मागितले म्हणूनही नाही. तुम्ही प्रत्यक्ष मैदानावर काम करणारे लोक आहात म्हणून आहे’. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि हा उपक्रम समूहाच्या वाढीस संधी देणाऱ्या देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग असल्याचे सांगितले.
या घोषणेनंतर संपूर्ण अरेनामध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत भावना दाटून आल्या, कारण या क्षणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले. अनेक फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला त्यांच्या दैनंदिन परिश्रमांची दुर्मिळ आणि अत्यंत वैयक्तिक पातळीवरील दखल असल्याचे म्हटले. ‘हे खरंच अनपेक्षित होतं. फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आमच्यासाठी तो एक खास क्षण होता,’ असे एका नर्सने कार्यक्रमानंतर सांगितले. हा ओळख व सन्मान उपक्रम बुर्जील होल्डिंग्सच्या पुढील विकास टप्प्याचा Burjeel 2.0 — भाग असून, त्यामध्ये अंमलबजावणी, जबाबदारी आणि लोक-केंद्रित वाढीवर भर देण्यात आला आहे.
संबोधनादरम्यान डॉ. शमशीर यांनी अबू धाबीतील समूहाच्या प्रमुख संस्थेचा, बुर्जील मेडिकल सिटीचा दीर्घकालीन दृष्टिकोनही मांडला. 2030 पर्यंत याला पुढील पिढीच्या मेडिकल सिटी इकोसिस्टममध्ये रूपांतरित करण्याचा मानस असून, पारंपरिक रुग्णालयाच्या संकल्पनेपलीकडे जाऊन प्रगत क्लिनिकल केअर, संशोधन, वैद्यकीय शिक्षण, पुनर्वसन आणि रुग्ण-केंद्रित जीवनशैली यांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे. हा दृष्टिकोन अबू धाबीच्या दीर्घकालीन आरोग्यसेवा धोरणाशी सुसंगत आहे. बुर्जील होल्डिंग्सने नेहमीच रुग्णसेवा पुरवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या सन्मानावर भर दिला आहे, आणि हा नवा उपक्रम त्या सातत्यपूर्ण दृष्टिकोनाचेच प्रतिबिंब आहे.