WPL 2026 : स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबी सुस्साट, सलग पाचवा विजय, गुजरातचा 61 धावांनी धुव्वा, प्लेऑफमध्ये धडक
GH News January 20, 2026 02:11 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमात (WPL 2026) आपला विजयी धमाका कायम ठेवला आहे. आरसीबीने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात 19 जानेवारीला सलग आणि एकूण पाचवा विजय मिळवला आहे. आरसीबीने बडोद्यातील कोटांबीमधील बीसीए स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात गुजरात जायंट्स वूमन टीमवर 61 धावांनी मात केली आहे. आरसीबीने गुजरातसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गुजरातने या विजयी धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. गुजरातला आरसीबीसमोर 20 ओव्हरमध्ये 100 च्या स्ट्राईक रेटनेही धावा करता आल्या नाहीत. गुजरातने 8 विकेट्स गमावून 117 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे हा सामना जिंकला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफमध्ये धडक दिली. आरसीबीने प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरलीय.

आरसीबीचा विजयी पंच

आरसीबीने या विजयासह या मोसमातील आपला सलग पाचवा तर गुजरात जायंट्स विरुद्धचा दुसरा विजय मिळवला. आरसीबीने याआधी गुजरात जायंट्सवर 16 जानेवारीला चौथ्या मोसमातील नवव्या सामन्यात 32 धावांनी मात केली होती. त्यामुळे गुजरातकडे सोमवारी 19 जानेवारीला गेल्या पराभवातील परतफेड करण्याची संधी होती. मात्र आरसीबीने पुन्हा गुजरातला पराभवाची धुळ चारली. आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम राखला. आरसीबीच्या या सलग पाचव्या विजयासह त्यांच्या खात्यात 10 पॉइंट्स झाले आहेत. तसेच आरसीबाचा नेट रनरेट हा +1.882 इतका झाला आहे. हा नेट रनरेट या सामन्याआधी +1.600 असा होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.