Gen z Mayor : महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान विकासाची नवी वाट; तरुणाईचे प्रश्न मांडणार नगरसेविका
esakal January 20, 2026 04:45 PM

कोल्हापूर : ‘महापालिकेच्या सभागृहात ‘जेन झी’चे प्रश्न मांडायचे आहेत. त्यांच्या प्रश्नांचे वास्तव खूप वेगळे आहे. बेरोजगारी असो किंवा महिलांचे सक्षमीकरण, प्रत्येक विषयाला न्याय द्यायचा आहे.

सभागृहातील सर्व सदस्यांत वयाने मी लहान असल्याने, माझी भूमिका पटवून देण्यासाठी मी ठाम असणार आहे,’ वयाच्या तेवीसाव्या वर्षी नगरसेविका झालेली मानसी सतीश लोळगे सांगत होती. ती सभागृहातील सर्वात तरुण नगरसेविका आहे.

Kolhapur Election : सत्तेत असू वा नसू, कोल्हापूरच्या विकासासाठी अखंड झटणारच; रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचा ठोस अजेंडा – व्ही. बी. पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षातून ती प्रभाग क्रमांक १९ मधून (ब, ओबीसी) निवडून आली असून, वडील माजी नगरसेवक सतीश लोळगे यांचा राजकीय वारसा पुढे चालवणार आहे. श्री. लोळगे २०१० ते २०१५ दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडून आले होते.

त्या वेळी मानसी केवळ सात-आठ वर्षांची होती. घरातील राजकीय वातावरण अनुभवत तिने शालेय अभ्यासक्रमाचे धडे गिरवले. वयाच्या आठव्या वर्षी तिने वकील व्हायचे ठरविले होते. त्यानुसार कला शाखेची पदवी घेतल्यानंतर तिने कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

Kolhapur City : कोल्हापूरसाठी हायब्रीड मेट्रोचा विचार; २०४७ व्हिजनसह शहराच्या कायापालटाचा निर्धार

महापालिकेच्या प्रभाग रचनेत ओबीसी प्रवर्ग झाल्याने तिच्या वडिलांनी तिला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे ठरविले आणि ती निवडूनही आली. मानसी म्हणते, ‘बेरोजगारीचा प्रश्न आजच्या तरुणाईला भेडसावतो आहे.

रिक्त जागांची भरती अनेक विभागांत झालेली नाही. एकीकडे वाढत जाणारे वय व त्यात नोकरी नसल्याने तरुणाई हतबल होत आहे. सोशल मीडियाचाही तिच्यावर परिणाम होऊ लागला आहे. तिला दिशा देण्यासाठी कौशल्यपूर्ण कोर्सेसची आवश्यकता आहे.

बचतगट व भिशी ग्रुपमधून एकवटलेल्या महिला या कोर्सेसमधून उद्योजिका होतील. ज्येष्ठ नागरिक व तरुणाई यांच्यातील संवादाची दरी वाढता कामा नये. जसे तरुणाईचे प्रश्न आहेत, तसे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधून ती मांडायची आहेत. कोल्हापूर ही फुटबॉल पंढरी असून, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.’

ती म्हणाली, ‘तरुणाईची प्रतिनिधी म्हणून सभागृहात माझी बाजू ठाम व सक्षमपणे मांडणार आहे. त्यासाठी मला माझ्या कायद्याच्या शिक्षणाचा उपयोग होणार हे निश्चित. स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी खूप बदल करून घ्यावे लागणार आहेत. कृत्रिम बुिद्धमत्तेचा वाढता वापर ही प्रत्येक क्षेत्रात नोकरीची कशी संधी बनू शकते, हे सांगावे लागणार आहे. त्याचा वापर महापालिकेच्या माध्यमातून शहर विकासात करावा लागेल.

’ मानसी म्हणते...

शहरातील तरुणाईचे प्रश्न प्राधान्याने मांडणार, विकासाच्या प्रक्रियेत बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणार, एआयच्या माध्यमातून विविध कामांची गती वाढवणार, महिलांसाठी कौशल्य विकासाचे कोर्सेस उपलब्ध करणार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.