सोलापूर : जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकीत (Election) भाजपने दैदिप्यमान यश मिळवलं असून 87 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे, सोलापूर महापालिकेत आता भाजपचा महापौर होणार असल्याचे निश्चित झालं आहे. मात्र, सोलापुरात (solapur) काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सोलापुरात काँग्रेस महाविकास आघाडीचे दोन खासदार असूनही पक्षाला मानहानीकारण पराभव स्वीकारावा लागल्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका होत आहे. त्यातच, पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर (Praniti shinde) बोचरी टीका केलीय. तत्पूर्वी, प्रणिती शिंदे यांनी जयकुमार गोरे हे काँग्रेस कार्यकर्ता होते, याची आठवण तरुन दिली होती.
मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी प्रणिती शिंदेच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. प्रणिती ताईंनी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचे काम केलं. आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी सोबत घेतलं, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळं प्रणिती शिंदेनी केलं, अशा शब्दात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर बोचरी टीका केली.
ज्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती त्या त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्या. त्यामुळे दोन नगरसेवक आल्यावर देखील समाधान वाटतय. 87 नगरसेवक आलेल्या भाजपवर त्या टीका करत आहेत. मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारण नाही, एवढा मोठा पराभव झाला तर ते स्वीकारायाला हवं. पालकमंत्र्यांनी गल्ली बोळात जाऊन पैसे वाटले वगैरे त्यांनी म्हटलं, त्यावेळी त्या सन्मानाने बोललं होतं का? तुम्ही दुसऱ्याचा सन्मान करा मग तुमचा ही सन्मान होईल, असा पलटवारही गोरेंनी केला. आपण लोकसभेला कुठे कुठे चर्चा केल्या होत्या हे सांगायला मला भाग पाडू नका. मी संधीसाधू आहे की काय आहे, हे भाजपला चांगलं माहिती आहे. मी जिथे आहे तिथे चांगलं काम करतो, ताईंनी आत्मपरीक्षण करावं, कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवता. बघा आपला घरं आणि अवस्था काय आहे,दोन नगरसेवक आलेत त्यांना आधी टिकवा, अशा शब्दात गोरेंनी प्रणिती शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान,आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे कमळ झेंडा फडकवणे हे आमचे उदिष्ट आहे. सांगोल्यात आम्ही आणि शहाजी बापू समविचारी आहोत त्यामुळे आम्ही सोबत लढू, पण शेकापला सोबत घेण्याबाबत खूप चर्चा होत आहेत, परिस्थिती अशी आहे की, आता एक स्थिती आहे आणि दहा मिनिटांनी काय होईल सांगता येतं नाही, असे म्हणत युतीबाबत अधिक बोलणे गोरेंनी टाळलं.
सोलापूर महापालिका निवडणुकीत पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार नाही. सोलापुरातील भाजपने हा निर्णय घेतला असून पक्षासाठी त्याग केलेल्या आणि शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींनाच संधी मिळणार आहे, असे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं. सोलापूर महापालिकेत भाजपला 102 पैकी 87 जागावर यश मिळालं आहे, त्यामुळे जवळपास 9 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात येणार आहे. स्वीकृत सदस्य होण्यासाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात ओढा आहे, त्यामध्ये पराभूत उमेदवारांकडून देखील मागणी केली जाते आहे. मात्र, भाजप पक्षाचं अनेक वर्ष काम करतात आणि अनेकजण दूर राहून गेले आहेत, त्यांनी पक्ष वाढवण्याचे काम केल्याने त्यांचा विचार पक्ष करणार आहे. ज्या कार्यकर्त्यांकडे व्हिजन आहे आणि पक्षासाठी त्याग केला आहे. त्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाईल, असेही रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं.
भाजप – 87
एमआयएम – 8
शिवसेना (शिंदे) – 04
काँग्रेस – 02
राष्ट्रवादी (यूपी) – ०१
राष्ट्रवादी (शपथ) – ०
शिवसेना (ठाकरे) – 0
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
आणखी वाचा