न्यूझीलंडने भारत दौऱ्यात जबरदस्त सुरुवात करत यजमान टीम इंडियाला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. न्यूझीलंडने अशाप्रकारे टीम इंडियाला पहिल्यांदाच पराभूत करत भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर आता उभयसंघात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधीची ही शेवटची टी 20i मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांची या मालिकेतून वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्याची गुरुवार 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 वनडे आणि 3 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पहिल्या वनडेसाठी परंपरेनुसार काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तसेच इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 वर्षांनंतर ओपनर झॅक क्रॉली याचं कमबॅक झालं आहे.
इंग्लंडसाठी झॅक क्रॉली आणि बेन डकेट या दोघांवर ओपनिंगची जबाबदारी असणार आहे. तर जेकब बेथल, हॅरी ब्रूक, जोस बटलर आणि जो रुट या चौघांवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेतील परिस्थिती पाहता प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 प्रमुख फिरकीपटूंचा समावेश केला आहे. आदिल रशीद आणि लियाम डॉसन या दोघांवर श्रीलंकेला गुंडाळण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच विल जॅक्स या स्पिनर ऑलराउंडरचीही रशीद आणि डॉसनला साथ मिळणार आहे.
इंग्लंड पहिल्या वनडेसाठी सज्ज
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), विल जॅक्स, सॅम करन, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन आणि आदिल रशीद.
दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी चरिथ असलंका श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. चरिथसमोर मायदेशात इंग्लंड विरुद्ध कर्णधार म्हणून टीमला मालिका जिंकून देण्याचं आव्हान असणार आहे.