भंडारा : येथील वस्तू व सेवा कर विभागातील कर निरीक्षक मनीष मुरलीधर सहारे (वय ५०) याला आज, ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तक्रारदार व्यापारी यांचा जीएसटी क्रमांक ऑक्टोबर २०२५ पासून बंद आहे. हा क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर महिन्यात विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर केला होता. यानंतर त्यांना जीएसटी विभाग नागपूर येथून त्यांच्या फर्मचे लेझर शीट बनवून त्या प्रमाणे चालान भरून पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते.
त्यावर तक्रारदार यांनी जीएसटी क्रमांकची लेझर शीट तयार करून १० हजार ४२८ रुपये ऑनलाइन चालान भरले होते. यानंतर तक्रारदार यांनी वस्तू व सेवा कर विभाग भंडारा येथील कर निरीक्षक मनीष सहारे यांची भेट घेतली व त्यांचा जीएसटी क्रमांक अद्यापपर्यंत सुरू झाला नसल्याबाबत सांगितले. त्यावर श्री. सहारे यांनी तक्रारदार यांना त्यांचा बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती.
परंतु, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १५ जानेवारी २०२६ ला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी १६ जानेवारी रोजी करण्यात आली. तेव्हा कर निरीक्षक मनीष सहारे यांची त्यांच्या कार्यालयात व पंचासमक्ष तक्रारदाराकडे ३५ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यावरून आज मंगळवारी सापळा रचून मनीष सहारे यांना त्यांच्या कार्यालयात रक्कम देण्यात आली.
Karad crime: 'जयसिंगपुरच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना कऱ्हाड पोलिसांनी केली अटक'; ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!यात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये लाच स्वीकारताना उपस्थित पथकाने पकडले. त्यानंतर भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या घराची झडती घेण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस उपधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस निरीक्षक उज्वला मडावी, नितेश देशमुख, पोलिस हवालदार अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, शिपाई विष्णू वरठी, सुमेध रामटेके, हिरा लांडगे, हितेश हलमारे, राजकुमार लेंडे, प्रतीक उके, मयूर सिंगणजूडे, दुर्गा साखरे, पंकज सरोते यांच्या पथकाने केली आहे.