पिंपरी, ता. २१ ः मिळकतकर थकबाकीदारांवर महापालिका कर आकारणी व कर संकलन विभाग बुधवारपासून (ता. २१) जप्तीची कारवाई सुरू करणार आहे. थकबाकीदारांना कोणतीही सूट न देण्याचा निर्णयही विभागाने घेतला असून, १८ विभागीय कार्यालयनिहाय कारवाई केली जाणार आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व करआकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सर्व सहाय्यक मंडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मिळकतकर थकबाकी वसुलीसंदर्भात चर्चा होऊन कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी विभागनिहाय स्वतंत्र पथके तयार केली आहेत. येत्या काही दिवसांत थकबाकीदारांना जप्ती अधिपत्रे बजावण्यात येणार आहेत. त्यानंतरही करभरणा न करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. निवासी थकबाकीदारांची नळजोड खंडित करणे आणि बिगरनिवासी थकबाकीदारांच्या मिळकतींवर थेट जप्ती अशी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत मिळकतकर तत्काळ भरून जप्तीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणार
मिळकतकर थकबाकीदारांची यादी महापालिका प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर संबंधित थकबाकीदारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी थकबाकी भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
आतापर्यंतची कारवाई
- जप्त मिळकती ः ३५
- नळजोड खंडित ः १३३
महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत मिळकतकर आहे. या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा व शिक्षण व्यवस्था सक्षमपणे राबवली जाते. वारंवार सूचना व नोटिस देऊनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.’’
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
थकबाकीदारांची अचूक माहिती, क्षेत्रनिहाय नियोजन आणि वेळापत्रकबद्ध कारवाई केली जात आहे. विभागीय कार्यालयांमार्फत दररोजचा आढावा घेतला जात आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा करून जप्ती व नळजोड खंडित करण्यासारखी कारवाई टाळावी.
- पंकज पाटील, उपायुक्त, करआकारणी व करसंकलन विभाग, महापालिका