swt216.jpg
19228
पणदूर ः येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राजेंद्र मगदूम. (छायाचित्र ः अजय सावंत)
सोयींअभावी युवकांची क्षमता वाया
राजेंद्र मगदूमः पणदूर महाविद्यालयातर्फे वेताळबांबर्डेत श्रमसंस्कार शिबिर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः कोकणातील युवकांमध्ये बुद्धिमत्ता, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी आहे; मात्र स्पर्धा परीक्षांबाबत योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची दिशा आणि आवश्यक सुविधा नसल्याने अनेकांची क्षमता वाया जात आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रे, ग्रंथालये व समुपदेशन व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले.
पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर तिठा, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १९ ते २५ जानेवारी या कालावधीत वेताळबांबर्डे गावात निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मगदूम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर होते.
यावेळी श्री. मगदूम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कोकणातील युवकांच्या सुप्त क्षमतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘‘कोकणातील युवकांमध्ये बुद्धिमत्ता, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी आहे; मात्र स्पर्धा परीक्षांबाबत योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची दिशा आणि आवश्यक सुविधा नसल्याने अनेकांची क्षमता वाया जात आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रे, ग्रंथालये व समुपदेशन व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे.’’
यासोबतच त्यांनी सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रकार, सोशल मीडियावरील फसवणूक, डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रभावी शैलीत स्पष्ट केले. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारे करिअर आणि कुटुंबव्यवस्था याचे वास्तव चित्र मांडत त्यांनी युवकांनी शिक्षण, करिअर व सामाजिक जबाबदारी यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास मोटिवेशनल स्पीकर अविनाश वालावलकर, डॉ. अरुण गोडकर (सचिव, दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी), शैलेश घाटकर (उपसरपंच, ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे) तसेच प्र. प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतचे सदस्य प्रदीप गावडे, श्रीमती सृष्टी सावंत, श्रीमती दिव्या सामंत, श्रीमती रश्मी तिवरेकर, श्रीमती जागृती गावडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सदस्य प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा. प्रांजना पारकर, प्रा. नागेश पालव, प्रा. उत्तरा सामंत, प्रा. पूनम सावंत तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार यांनी निवासी शिबिरामागील सामाजिक व शैक्षणिक उद्दिष्टे स्पष्ट केली. अध्यक्ष जैतापकर, डॉ. गोडकर, उपसरपंच घाटकर आणि सदस्य गावडे यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा देत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. धोंडू गावडे यांनी तर आभार प्रा. पूनम सावंत यांनी केले. या निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा, सामाजिक भान, ग्रामविकास, व्यसनमुक्ती व व्यक्तिमत्त्व विकासाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजणार असून महाविद्यालय व ग्रामस्थ यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होईल, अशा भावना महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख यांनी व्यक्त केल्या.