India vs New Zealand T20 : उपराजधानी होणार क्रिकेटमय; नागपूरकरांमध्ये भारी उत्सुकता, जामठा स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड लढत
esakal January 21, 2026 04:45 AM

Nagpur gears up for the India vs New Zealand T20 match at Jamtha Stadium : नागपूर, ता. २० : उपराजधानीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना विशेषतः टी-२० किंवा वनडे असला की, हमखास वर्धा रोडवरील विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जामठा स्टेडियम हाऊसफुल्ल असते. उद्या, बुधवारी होणाऱ्या भारत-न्यूझीलंड टी-२० लढतीच्या निमित्ताने यावेळीदेखील जामठ्यात जवळपास असेच चित्र पाहायला मिळणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर टी-२० सामना होत असल्यामुळे नागपूरकर क्रिकेटप्रेमींमध्ये सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

मनपा निवडणूकीच्या निमित्ताने आतापर्यंत शहरातील राजकीय वातावरण तापले होते. आता नागपूरकरांना क्रिकेटचा 'फिव्हर' चढला आहे. जामठ्यात सप्टेंबर २०२२ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा टी-२० सामना खेळला गेला होता. तब्बल साडेतीन वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटप्रेमींना टी-२० चा थरार जवळून पाहायला व अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच क्रिकेटप्रेमींमध्ये जोश, उत्साह व उत्सुकता दिसून येत आहे. विशेषतः तरुणाईमध्ये क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला आहे.

भारत-न्यूझीलंड टी-२० च्या ऑनलाईन तिकीटविक्रीला नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही मिनिटांतच तिकिटे हातोहात विकल्या गेली. या प्रक्रियेत मोजक्याच नशीबवान क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांना तिकिटे मिळाली. बहुतेकांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे अजूनही कुठून एखाद्या तिकिटाचा जुगाड जमतो का? याची चाचपणी करताना ते दिसून येत आहे. तिकीटधारक आनंदाने जामठ्यात जाऊन 'याची देही याची डोळा' सामना पाहतील. मात्र ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांना नाईलाजाने घरीच टीव्हीवर सामना बघून 'दुधावरची तहान ताकावर' भागवावी लागणार आहे.

India vs New Zealand 2026 ODI Squad : ३ खेळाडूंनी वाढवली अजित आगरकरची डोकेदुखी! त्यांना संघात नाही घेतलं तर काय खरं नाय... चौकार-षटकारांची होणार आतिषबाजी

जामठ्याची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असल्यामुळे या सामन्यात 'जम के' चौकार-षटकारांची आतिषबाजी होणार आहे. दोन्ही संघांमध्ये आक्रमक फटकेबाजी करणारे फलंदाज असल्यामुळे स्टेडियमवर उपस्थित ४५ हजार प्रेक्षकांचे मनोरंजन होईल, यात शंका नाही. विशेषतः भारताच्या अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या व शिवम दुबेकडून त्यांना जोरदार फटकेबाजीची अपेक्षा राहणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघच विजयी व्हावा, अशी नागपूरकर निश्चितच प्रार्थना करतील.

घरून लवकर निघा अन उशिरा जा

भारत-न्यूझीलंड टी-२० सामना सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून, प्रेक्षकांसाठी स्टेडियमचे प्रवेशद्वार दुपारी ४ वाजता खुले होणार आहे. त्यामुळे वर्धा रोडवर वाहतूकीची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. सामन्यादरम्यान नेहमीच हे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे संभाव्य 'ट्राफिक जॅम' लक्षात घेता प्रेक्षकांनी सामन्यासाठी घरून लवकर निघावे आणि सामना संपल्यावरही गर्दी ओसरल्यावर आरामात घरी परतावे. अन्यथा कोंडीत सापडून मनःस्ताप होऊ शकतो, आनंदावर विरजण पडू शकते. तिकीट विक्रीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, बुधवारी ४४ हजार प्रेक्षकक्षमता असलेले जामठा स्टेडियम हाऊसफुल्ल राहणार, हे उल्लेखनीय. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने क्रिकेटप्रेमींना मेट्रो किंवा शहर बस सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.

India VS New Zealand T20 Series: टी-२० वर्ल्डकप अगदी दारात; न्यूझीलंडविरुद्धची मालिका ठरणार फायनल ट्रायल? वाहतूक पोलिसांचीही अग्निपरीक्षा

या सामन्याच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांचीही अग्निपरीक्षा होणार आहे. कारण सामन्याच्या दिवशी वर्धा रोडवर दुपार नंतर उशिरा रात्रीपर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सांभाळताना पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे पोलिस विभागासाठीही हा सामना अग्निपरीक्षाच राहणार आहे.

प्रेक्षकांनी या वस्तू सोबत नेऊ नये

प्रेक्षकांनी सामना पाहायला जाताना काही बाबी ध्यानात ठेवण्याची गरज आहे. सामन्याच्या दिवशी स्टेडियमच्या आत व बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खेळाडूंना इजा पोहोचविणाऱ्या काठी असलेले तिरंगा, सेल्फी स्टिक्स, कॅमेरे, लायटर, माचिस, सिगारेट, विडी, हेल्मेट, पर्स, बॅग, पॉवरबँक, खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्ससह अन्य मौल्यवान वस्तू आतमध्ये नेण्यास सक्त मनाई राहणार आहे. पोलिसांकडून प्रवेशद्वारावर प्रत्येकाची कसून तपासणी होणार असल्याने या वस्तू आतमध्ये नेण्यास मज्जाव केला. जाईल. अशावेळी सोबत आणलेल्या वस्तू इतरत्र ठेवण्यासाठी धावपळ होऊ शकते. अनेकदा प्रेक्षकांना या वस्तू गेटवरच सोडून द्याव्या लागतात. त्यामुळे वरील वस्तू शक्यतो सोबत नेऊ नये.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.