तात्या लांडगे
सोलापूर : पनवेलजवळील खारघर येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ (ता. मोहोळ) भीषण अपघात झाला. त्यात पाच ठार तर एक गंभीर जखमी झाला. वरवडे टोल नाक्यापासून २६ किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातापूर्वी कारचा स्पीड अंदाजे १२० ते १३० किमी होता, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोल नाक्यावर ती कार रात्री ११.१४ वाजता आली होती. टोलपासून पुढे दोन ठिकाणी रस्ता खूपच खराब आहे, ज्या ठिकाणी वाहनांचा वेग ताशी २० ते ३० पर्यंतच ठेवावा लागतो. तरीदेखील, अवघ्या २० मिनिटांत ती कार २५ किमी पुढे आली होती, असेही पोलिसांनी सांगितले. भीषण अपघातात पाच ठार झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी अपघातस्थळी भेट दिली. त्यावेळी कारचा वेग, अपघाताच्या कारणांचा अंदाज घेण्यात आला.
चालकाने कोठेही न थांबता सलग सहा ते आठ तास वाहन चालविले, रात्री पावणेबाराच्या सुमारास त्याला डुलकी लागली आणि वाहन आहे त्या स्पीडने रस्त्याच्या डाव्या बाजूच्या झाडांवर जोरात आदळले. सुरवातीला लिंबाच्या झाडाला धडकलेली कार ते झाड तोडून पुढच्या झाडावर जोरात आदळली. कार चक्काचूर झाल्याने मशिन आणून कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले, असेही पोलिसांनी सांगितले. वाहनचालकांनी सलग वाहन चालवू नये, वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले आहे.
कारच्या धडकेत दोन झाडे तुटली
बुलेट ट्रेनचा स्पीड ताशी ३८० किमीपर्यंत असतो. वंदे भारत रेल्वेचा वेग सर्वसाधारण ताशी ११० ते १३० पर्यंत असतो. देवडी पाटीजवळ अपघातग्रस्त झालेल्या कारचा वेग हा वंदे भारत रेल्वेच्या वेगाएवढाच असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण, रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडांना धडकलेली कार चक्काचूर झाली आहे. कारच्या धडकेत लिंबाचे व दुसरे एक झाड तुटून पडले, इतका भयानक अपघात होता. अपघातानंतर मोठा आवाज आला आणि परिसरातील लोक त्या ठिकाणी धावल्याचे पोलिसांनी सांगितले.