निकृष्ट रस्त्याच्या बांधकामाविरोधात आंदोलन
ठेकेदारावरील कारवाईसाठी माजी नगरसेवकाचे बेमुदत उपोषण
पालघर, ता. २० (बातमीदार) : नगर परिषद हद्दीतील पालघर पूर्व येथील घोलवीरा नाका ते मशीद रोड येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक प्रवीण मोरे यांनी केला आहे. तसेच नगर परिषद प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई न करता, ठेकेदारालाच पाठीशी घालत असल्याचे सांगत प्रवीण मोरे हे सोमवारपासून (ता. १९) पालघर नगर परिषदेच्या कार्यालयाजवळ आमरण उपोषणास बसले आहेत.
प्रवीण मोरे यांनी नुकतेच घोलवीरा नाका ते मशीद रोड या मार्गावरील रस्त्यांच्या बांधकामांची पाहणी केली. तेव्हा त्यांना त्यात काही त्रुटी आढळल्या. त्यानंतर मोरे यांनी पालघर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार दाखल करून या प्रकाराबाबत कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचे प्रवीण मोरे म्हणाले. मी स्वतः या रस्त्यांची पाहणी केली. तेव्हा मला असे दिसले की, मंजूर अंदाजपत्रक व आराखड्याप्रमाणे येथे कोणतेच काम झालेले नाही. त्याबाबत एक पत्र मी मुख्याधिकाऱ्यांना दिले व तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, माझ्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने मी १९ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसलो आहे. मंगळवारी माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे, पण अद्याप प्रशासनाने त्याची कोणतीच दखल घेतलेली नाही. तसेच जोपर्यंत प्रशासन हे ठेकेदार व संबंधितांवर कारवाई करणार नाहीत, तोपर्यंत मी माझे हे बेमुदत उपोषण कायम राखणार असल्याचे प्रवीण मोरे यांच्याकडून सांगण्यात आले.
----------------
प्रतिक्रिया
माजी नगरसेवक प्रवीण मोरे यांची तक्रार दाखल झाल्यानंतर सदर रस्त्याची पाहणी केली. आम्हालाही रस्त्याचे काम आराखड्याप्रमाणे झाले नाही, असे दिसून आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत आम्ही ठेकेदारावर कारवाई करू. तसेच १६ जानेवारीला आम्ही उपोषण करू नका, अशी विनंती प्रवीण मोरे यांना केली होती. आम्ही ठेकेदारावर कारवाई करू असे लेखी स्वरूपातील पत्रही मोरे यांना दिले आहे. त्यानुसार लवकरच आम्ही कारवाईला सुरुवात करू.
विपुल कोरफड, अभियंता बांधकाम विभाग, नगर परिषद पालघर