भोईवाडा वाहतूक विभागात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभादेवी, ता. २० : समाजातील गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून भोईवाडा वाहतूक विभागाने मानवतेचा आदर्श निर्माण केला. विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांसह वाहतूक पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभारी भोईवाडा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा वाहतूक विभाग कार्यालय, सुपारी बाग जंक्शन, लालबाग येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात रस्त्यावरील शिस्त राखणाऱ्या वाहतूक पोलिसांनी रक्तदानासारख्या महान कार्यातून आपली सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे पोलिस निरीक्षक सरदार नाळे यांच्यासह उद्योजक सतीश पाटील व विभागातील सर्व वाहतूक पोलिसांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून समाजप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली. या प्रसंगी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले तसेच आरोग्यदूत संतोष महापुरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
या शिबिरात पीएसआय जगताप, कॉन्स्टेबल चव्हाण, प्रवीण महाले, अभिजित खंडागळे, रमेश घोरपडे, मंगेश कांबळे, भाऊसाहेब राजोळे, प्रणाली तांबे यांच्यासह के.ई.एम. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कविता ससाने यांच्या योगदानामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरला.