मेट्रोच्या लोकार्पणात अडथळे
जिल्हा परिषद निवडणुकानंतरचा मुहूर्त
भाईंदर, ता. २० (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरासाठी डिसेंबरमध्ये मेट्रो सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने उद्घाटन लांबणीवर पडले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे मेट्रोच्या लोकार्पणाला ५ फेब्रुवारीनंतरचा मुहूर्त मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील दहिसर पर्यंत येणारी मेट्रो भाईंदर पश्चिमपर्यंत विस्तारण्यात आली आहे. त्याचा पहिला टप्पा दहिसर ते काशी मिरा पूर्ण आहे. या मार्गावरील सुरक्षेच्या चाचण्यादेखील पूर्ण झाल्या असून, काही दिवसात प्रमाणपत्र मिळणार आहे. सुरुवातीला मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र, १५ डिसेंबरपासून महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागली होती. त्यामुळे लोकार्पण झाले नाही. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्व पक्षांचे नेते निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने मेट्रोचे लोकार्पण रखडणार आहे.
---------------------------
तीन उड्डाणपुलांची उभारणी
- भाईंदर ते काशी मिरा यादरम्यान मेट्रोखाली तीन उड्डाणपूल आहेत. त्यापैकी हटकेश व एस के स्टोन नाका येथील दोन उड्डाणपूल कार्यान्वित झाले आहेत. गोल्डन नेस्ट नाक्यावरील तिसऱ्या उड्डाणपुलाचे कामही आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांसाठी हा पूल लवकरच खुला होणार आहे.
- तिसऱ्या उड्डाणपुलाला भाईंदर पश्चिम भागात येण्यासाठी सध्या उतार देण्यात आलेला नाही. त्यामुळे भाईंदर पश्चिमेतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उड्डाणपुलाला गोल्डन नेस्ट चौकात भाईंदर पश्चिम येथील वाहनांसाठी एका मार्गिकेचा उतार दिला जाणार आहे.
-----------------------------------
मिरा-भाईंदरच्या मेट्रोचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे, परंतु दोन्ही नेते पुन्हा निवडणूक प्रचारात व्यस्त होणार आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल ५ फेब्रुवारीला आहेत. त्यानंतर मेट्रोचे लोकार्पण केले जाणार आहे.
-प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री