सातबारावर पीक पेरा नोंद आवश्यक ः पवार
esakal January 21, 2026 10:45 AM

19079
19080

सात-बारावर पीक पेरा
नोंद करणे आवश्यक

तहसीरदार पवार ः शनिवारपर्यंत अंतिम मुदत

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारावर पीक पेरा नोंद करून घेण्याचे आवाहन येथील तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.
राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची (रब्बी हंगाम व संपूर्ण वर्षाची ई पीक पाहणी) सुरुवात १० डिसेंबरला झाली. शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर पीक पेरा स्वतः मोबाईलव्दारे नोंदणी करायचा आहे. शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्यासाठीची अंतिम तारीख २४ जानेवारीपर्यंत आहे. ई-पीक पाहणी अॅपद्वारे माहिती अपलोड करावी. संबंधित शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास संबंधित गावचे तलाठी, कोतवाल तसेच संबंधित गावात नियुक्त केलेले सहायक यांची मदत घेऊन आपल्या पिकांची नोंदणी करून घेण्यात यावी. ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी न केल्यास सात-बारावर पीक पेरा कोरा राहील, जो नंतर भरता येत नाही. त्यामुळे पीक विमा व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळवण्यास अडचण निर्माण होईल. ऐनवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती याबाबत पीक विमा मिळण्यासाठी सातबारावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी रब्बी पिकांची व फळपिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.