क्रशरमुळे होणाऱ्या प्रदूषणाने
सोनुर्लीमध्ये शेतीचे नुकसान
ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः सोनुर्ली येथे सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे उडणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ब्लास्टिंगमुळे घरांचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थ नकुल गावकर यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने श्री. गावकर यांनी २६ जानेवारीला उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
गावकर यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या बागेतील नारळ, सुपारी, केळी आणि काजूच्या झाडांवर क्रशरच्या प्रदूषणामुळे वाईट परिणाम होत आहे. हे क्रशर घरापासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर असून, तेथील ब्लास्टिंगमुळे घराला तडे गेले आहेत. यामुळे त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी योग्य कारवाई आणि नुकसान भरपाई न मिळाल्यास २६ जानेवारीला येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे गावकर यांनी पत्रात नमूद केले आहे. तहसीलदारांनी या प्रकरणी संबंधिताला पत्र पाठवून योग्य दखल घेण्याच्या सूचना संबंधित क्रशर कंपनीला दिल्या आहेत. मात्र, अद्यापही सूचनांचे पालन न झाल्याने गावकर यांनी उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे.