मुलींनी उच्चशिक्षित, सक्षम होणे गरजेचे ः सय्यद
esakal January 21, 2026 10:45 AM

पाईट, ता. २० ः देश व समाज घडविण्यासाठी विद्यार्थिनींनी उच्चशिक्षित व सक्षम होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत प्रमुख न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे इंग्रजी माध्यम विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
खेड तालुका विधी सेवा समिती व खेड बार असोसिएशन यांच्या वतीने राजगुरुनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे इंग्रजी माध्यम विद्यालयात बालविवाह मुक्त भारत मोहीम अंतर्गत बालिका दिन व इतर जनजागृती कार्यकम तसेच कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते.
त्यावेळी तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ चे बी. एस. वावरे, एस. पी. पोळ - जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, (पोक्सो स्पेशल कोर्ट खेड-राजगुरुनगर) दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे ए. बी. होडावडेकर, एस. बी. पवार, सरिता विश्वंभरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तरचे एस. बी. नाईकनवरे, जे. सी. गुप्ता व एस. व्ही. उतकर, इंग्रजी माध्यम विद्यालयाचे प्राचार्य जॉन, खेड वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड वैभव कर्वे व सर्व पदाधिकारी व जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय खेडचे अधिक्षक एन. बी. बहिरट, न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी विशाल दौंडकर तसेच विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर एस. नाईकनवरे व सरिता विश्वंभरण यांनी बालिका दिवस व बालविवाह जागृकतेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ए. बी. होडावडेकर यांनी समाजाप्रती असलेल्या मुलभूत कर्तव्याची जाणीव करून देत देशाच्या संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यांनतर ॲड संदीप घुले यांनी विविध सेवांची माहिती दिली.
आभार ॲड स्वरूपा वाडेकर यांनी मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.