नवी मुंबईत सांस्कृतिक महोत्सवाची धूम
नेरूळ, ता. २० (बातमीदार) : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला-क्रीडा महोत्सव २०२६’ अंतर्गत सीबीडी बेलापूर येथील सुनील गावसकर मैदानावर शालेय समूह नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत नवी मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवरील नृत्य, पारंपरिक लोकनृत्य व कोळीगीते सादर केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे व संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. परिणामी प्राथमिक विद्या मंदिर, बेलापूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला; पीपल्स एज्युकेशन इंग्रजी माध्यम शाळा यांनी द्वितीय तर पी.एस. सेंटर स्कूल यांनी तृतीय क्रमांक मिळवला. गौरव स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
दरम्यान, हा महोत्सव २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.