सोलापूर : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून चोरीचे १३ लाख ९२ हजार ९९८ रुपयांचे मोबाईल विकत घेणाऱ्या दुकानदारास जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. फारूक महमद हनिफ पठाण (वय ४२, रा. सिद्धेश्वर पेठ, शहापूर चाळ) असे त्याचे नाव आहे. याला मोबाईल विकणाऱ्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
सोलापूर शहर-ग्रामीण आणि विजयपूरसह अन्य शहरांतील बाजारपेठा, यात्रेतून गणेश ऊर्फ अप्पा तुकाराम बैरुणगी व लखन तुकाराम बैरुणगी (दोघेही रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) यांनी तब्बल १११ महागडे मोबाईल चोरले होते. ते मोबाईल दोघांनीही मोबाईल विक्रेता फारूक पठाण याला विकले होते. दरम्यान, चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गणेश व लखन बैरुणगी यांना शहर पोलिसांनी डिसेंबर महिन्यात तडीपार केले आहे. या कारवाईपूर्वी म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात त्या दोघांनी चोरीचे मोबाईल विकले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. चोरीचे मोबाईल घ्यायला इक्बाल मैदानाजवळ आलेल्या फारूकला पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यावेळी त्याने ही कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक एम. डी. नदाफ, शरीफ शेख, गजानन कगणगिरी, वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, भारत गायकवाड, संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाणे, युवराज गायकवाड, उमेश सावंत, इकरार जमादार, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने पार पाडली.
‘आयएमईआय’वरून मालकांचा शोध
चोरट्यांकडून विकत घेतलेल्या मोबाईलमधील काही मोबाईल फ्लॅश मारण्यात आले आहेत. १४ लाख रुपयांचे १११ महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आता मोबाईलच्या ‘आयएमईआय’ क्रमांकावरून मूळ मालकांचा शोध घेऊन ते त्यांना परत दिले जातील, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी यावेळी दिली.