कर्ज वसुलीवरून संतापाची लाट
वाड्यातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवदेन
वाडा, ता.२० (बातमीदार)ः अतिवृष्टी, अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. अशातच शासनाने एक परिपत्रक काढून कर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. मात्र, वाडा तालुक्याचा त्यामध्ये समावेश नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अतिवृष्टी, अवकाळी पावसाने भात शेतीची अक्षरशः वाट लावली आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतित आहेत.भात शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र शासनाने १० ऑक्टोबर २०२५ रोजी परिपत्रक काढून शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला एक वर्षासाठी स्थगितीचा निर्णय घेतला आहे. पण या परिपत्रकात वाडा तालुक्याचा समावेश नसल्याने अन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.