Pune Crime : आरोग्य उपसंचालकांचा पाय खोलात! फलटणमधील फार्मासिस्टकडून नोकरीसाठी उकळले १० लाख
esakal January 21, 2026 08:45 AM

पुणे - फलटणमधील एका फार्मासिस्ट तरुणाला वैद्यकीय शिक्षण विभागात औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून १० लाख रुपये उकळल्याप्रकरणी पुण्यातील आरोग्यसेवक रामचंद्र घ्यार यासह आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे दोन जानेवारीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन लाखांची लाच घेताना घ्यारला अटक केली आहे. त्यामुळे आरोग्यसेवक घ्यारसह डॉ. पवार यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

आरोग्य सेवकाची बदली करण्याच्या प्रकरणात तीन लाख रुपयांची लाच घेताना घ्यारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. तो सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याचे आणखी एक प्रकरण समोर आले असून, त्याने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये फलटण येथील अभिषेक गावडे या तरुणाकडून १० लाख उकळल्याचे समोर आले आहे. यामध्येदेखील डॉ. पवार यांचे नाव समोर आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तक्रारदार गावडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची भेट घ्यार याच्याशी पुण्यात झाली होती. त्यानंतर घ्यार याने तक्रारदाराला व्हॉटस्ॲपवर कॉल करून, वैद्यकीय शिक्षण विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर घ्यारने त्यावेळी डॉ. पवार यांना फोन केला व त्यांनीही दहा लाख रुपये दे असे सांगितले, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, अद्याप नोकरीला लावले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

आईचे दागिने विकून दिले पैसे

तक्रारदाराने आईचे सोन्याचे दागिने विकून सात लाख रुपयांची रक्कम घ्यारच्या खात्यावर पाठवली. तसेच उरलेले तीन लाख रुपये हे दागिने गहाण ठेवून पाठवले.

आरोग्य विभाग डॉ. पवारांवर मेहेरबान

पैशांच्या सलग दोन प्रकरणात डॉ. पवार यांचे नाव येऊनही, आरोग्य विभागाने त्यांची साधी चौकशी तर सोडाच... उपसंचालक पदाचा पदभारदेखील काढून घेतला नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर मेहेरबान आहेत का? असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी विचारत आहेत.

तक्रारदाराने पैसे घ्यारच्या खात्यावर पाठवल्याचे पुरावे दिले असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, तसेच त्याबाबत डॉ. पवार यांच्यासोबत बोलणे झाल्याचेही सांगितल्याने डॉ. पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी घ्यारला अटक करून पुढील तपासानुसार कारवाई करण्यात येईल.

- संदीप जगताप, पोलिस निरीक्षक, फलटण, ग्रामीण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.