उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : नुकताच कोट्यवधी खर्च करून तयार केलेला रस्ता अवघ्या काही दिवसांतच तड्यांनी भरलेला, तर पुढे काही अंतरावर तोच रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. उल्हासनगरमधील कुर्ला कॅम्प कालिमाता मंदिरासमोर आणि प्रभाग समिती क्रमांक ४ समोरील नेताजी चौक येथे एमएमआरडीएकडून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची दुरवस्था उघडकीस आली आहे. या निष्काळजीपणावर सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅम्प कालिमाता मंदिरासमोर तसेच प्रभाग समिती क्रमांक ४ समोरील नेताजी चौक परिसरात एमएमआरडीएकडून नुकतेच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तडे पडल्याचे स्पष्ट दिसून आले. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचालक व पादचाऱ्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तडे वाढत चालल्याने संबंधित ठिकाणी सध्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुढे काही अंतरावर आताच नव्याने तयार केलेला रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी, धूळ-मातीचे प्रमाण वाढणे आणि स्थानिक नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे.
कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
ॲड. चंदनशिव यांनी या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. नव्या रस्त्याला इतक्या लवकर तडे जाणे हे कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. सार्वजनिक निधीचा असा अपव्यय सहन केला जाणार नाही. संबंधित ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक नागरिकांनीही या कामाबाबत असमाधान व्यक्त करत, तातडीने दर्जेदार दुरुस्ती, कामाची तांत्रिक तपासणी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कडक नियंत्रण यंत्रणा लागू करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन आणि एमएमआरडीए यावर काय पावले उचलते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर : कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या रस्त्याला काही दिवसांतच तडे पडले. तर दुसऱ्या छायाचित्रात हेच तडे दुरुस्त केले जात आहेत.