'भाषा वैभव' कार्यक्रमातून संस्कृत भाषेचा गौरव
esakal January 21, 2026 07:45 AM

‘भाषा वैभव’ कार्यक्रमातून संस्कृत भाषेचा गौरव
घाटकोपरमध्ये कार्यक्रम; स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य संस्कृत अकादमी आणि माध्यम फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १९) घाटकोपर (पश्चिम) येथील एस. पी. आर. जैन कन्या शाळेत ‘भाषा वैभव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून संस्कृत भाषेचा साहित्य अकादमीत समावेश करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात संस्कृत भाषेवरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा महाराष्ट्र पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी आपल्या भाषणात संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करत, “संस्कृत भाषेशिवाय भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य रामव्यास उपाध्याय यांनी संस्कृत छंद, त्यांचे शुद्ध उच्चार आणि त्यामागील शास्त्रीय वैशिष्ट्य स्पष्ट करत, “संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन व वैज्ञानिक भाषा असून, ती मृत नसून अमृत भाषा आहे,” असे सांगितले.
या कार्यक्रमास एस. पी. आर. जैन कन्या शाळेच्या व्यवस्थापन ट्रस्टी मीनाबेन खेताणी, मुंबई गुजराती संघटनेचे संस्थापक ट्रस्टी भावेश मेहता, नव्य व्याकरणाचार्य पं. दामोदर त्रिपाठी, चिन्मय मिशनचे विराज सडेकर, भावेश वोरा, भावना डोडिया, रमेश डोडिया, अभय खेताणी तसेच शाळेच्या प्राचार्या नंदाबेन ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धांचे परीक्षण कविता ठक्कर व मनीषा ठक्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजीव मिश्र यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौरभ शिंदे यांनी मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.