नाशिक: नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तब्बल ९६ शाळा असल्याचे धक्कादायक वास्तव शासकीय आकडेवारीतून पुढे आले आहे. निफाड आणि येवला तालुक्यांतील प्रत्येकी एका शाळेत फक्त एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कमी पटसंख्येच्या शाळांचा सर्वाधिक भार सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व येवला तालुक्यांवर असल्याचेही स्पष्ट झाले.
दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केल्यावर अखेर शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय रद्द केला आहे.
याआधी २०२४ मध्ये राज्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक कंत्राटी तत्त्वावर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विरोधानंतर सरकारने २० ऐवजी १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठीच हा निर्णय लागू केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यालाही विरोध झाल्याने शासनाला अखेर माघार घ्यावी लागली.
ग्रामीण व आदिवासी भागातून होणारे स्थलांतर, खासगी शाळांकडे वाढता ओढा आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सातत्याने घटत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. केवळ निर्णय मागे घेणे पुरेसे नसून, शाळा टिकविण्यासाठी ठोस, दीर्घकालीन पुनरुज्जीवन धोरण आखण्याची गरज शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Kolhapur ZP : महापौर टॉस टाळण्यासाठी भाजप आक्रम, ४१ च्या बहुमतासाठी हालचाली; सांगलीत महायुतीची सत्ता निश्चित होणार?तालुकानिहाय दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा
बागलाण- ५, चांदवड- २, देवळा- ५, इगतपुरी- ४, कळवण- ६, मालेगाव- ७, नांदगाव- ६, नाशिक- १, निफाड- ३, पेठ- ५, सिन्नर- १२, सुरगाणा- १७, त्र्यंबकेश्वर- १३, येवला- १०.
पटसंख्या घट- शाळांचे अस्तित्व धोक्यात
१० पटसंख्या- २६ शाळा
९ पटसंख्या- १८ शाळा
८ पटसंख्या- ९ शाळा
७ पटसंख्या- १२ शाळा
६ पटसंख्या- ११ शाळा
५ पटसंख्या- १३ शाळा
३ पटसंख्या- १ शाळा