आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये…; जिल्हा परिषदेच्या शाळेती
Marathi January 21, 2026 02:25 PM

बीड: बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी अंकिता कवचट या विद्यार्थिनीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांना पत्र लिहलं आहे. शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि कथित भ्रष्टाचाराबाबत थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत गावच्या सरपंच असलेल्या प्रतीक्षा शिंदे यांना माहिती विचारली असता त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री उपमुख्यमंत्री कोण आहेत ते माहिती आहे हाच आमच्या गावचा विकास असून या प्रकरणाची चौकशी व्हावी असे त्या म्हणाल्या आहेत. त्या विद्यार्थिनीला भेटणार असल्यास देखील त्या म्हणाल्या आहेत.

एकाद्या विद्यार्थिनीने धाडस करत आवाज उठवत थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पोहोचवल्याने तिचे कौतुक होत असून,मात्र या पत्रामुळे ग्रामीण भागातील शाळांची वास्तविक स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान अंकिताने आपल्या पत्रात शाळेची दयनीय अवस्था मांडली आहे. शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची दुरवस्था, बसण्याची योग्य सोय,शैक्षणिक साहित्य अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे तिने नमूद केले आहे. कागदावरच खेळाचे साहित्य,पाणी फिल्टर, प्रोजेक्टर इतर साहित्य दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात ते शाळेत उपलब्ध नसल्याचे तिचे म्हणणे आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

चिमुकल्या मुलीने पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय?

ते, अजित काका उर्फ ​​दादा पवार

विषय- आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका

आदरणीय अजितदादा पवार साहेब
(उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्हा)

नमस्कार दादा आणि माझे काका मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहीत आहे. हात थरथरतोय पण मनातलं दुःख कोणाला तरी सांगायलाच हवा म्हणून धीर करून हे पत्र लिहीत आहे.

दादा आमची ही शाळा नावापुरती नसून आमच्यासाठी ज्ञानमंदिर आहे. येथील सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी उभे राहतील, इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभले आहेत. पण तिथे शिकण्यासाठी कुठलीच सोय नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, नाही हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधं साहित्यही नाही, तरीही आम्ही शाळेत येतो. कारण आम्हाला शिकायचं आहे.

पण दादा कागदावरच मात्र सगळं आहे असं दाखवलं जातं. आमच्या शाळेत सगळी व्यवस्था झाली आहे, असं सांगून लाखो रुपये काढले गेले आहेत, असं आम्हाला कळतंय. सरपंच बाईंचे पती हे सगळं पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आणि स्वप्न नाहीत का? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचं आहे. पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही कसं पुढे जाणार? काका तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, हा तुमचा जिल्हा आहे, आम्ही फार काही मागत नाही, फक्त शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचे साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी व्यवस्था द्या. दादा हे माझं पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल. पण आमचं दुःख मोठा आहे. एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयाने आमचा आयुष्य बदलू शकतx.

आपलीच
परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.