मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुका कार्यालयात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकांसाठी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते. तर, ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना-मनसेच्या या युतीवरुन जोरदार चर्चा रंगली आहे. आता, कल्याण डोंबिवलीतील या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकल परिस्थिती काय आहे, हे मला माहिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक लोकं असतात, ते आघाड्या-युत्या करत असतात. निशाणीमध्ये चर्चा वाटाघाटी होतात, माजी आमदार राजू पाटील आमचे नेते आहेत, त्यांनी इंटर्नल ॲडजस्टमेंट केली असावी, सगळीकडे असंच चित्र दिसत असतं, असे म्हणत बाळा नांदगावकर यांनी मनसे-शिवसेना युतीला एकप्रकारे खो दिलाय. वाजपेयी पंतप्रधान झाले होते तेव्हा शतप्रतिशत नारा त्यांनी दिला होता, अशात अनेक पक्ष हा नारा देतात. आता तिकडे स्थानिक ठिकाणी काही बिनसले असेल तर माहिती नाही. कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेचं बिनसलं असावं, त्यामुळे तडजोडी झाल्या असाव्यात. काहीतरी घडलं असेल त्यामुळे हे होत असेल. काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात, तेव्हा काही बोलायच्या नसतात, असेही नांदगावकर यांनी म्हटले.
उद्धव साहेब आणि राज ठाकरे राजकारणात नवीन नाहीत, राजकारण कधी काहीही होऊ शकतं, कोणीही मित्र-शत्रू नसतो. कोणतीही गोष्ट करताना नकारात्मक बघून चालत नाही, मुंबईकरांचे आम्ही आभार मानतो. आमच्या पक्षाचे नुकसान अधिक झाले हे मान्य करतो. मात्र, तडजोडी होत असतात, भविष्यात कोण कोणाची मदत घेईल, काहीही होऊ शकतं, असे स्पष्ट शब्दात बाळा नांदगावकर यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव साहेब बोलून गेले, पण देवाच्या मनात या वक्तव्याचे तुम्ही वेगवेगळे अर्थ लावले, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 53 नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय. विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली.
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
आणखी वाचा