रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी आहे. नागपूरच्या राजनांदगाव ते कलमना दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २४ जानेवारी ते ३१ जानेवारी या ८ दिवसांच्या कालावधीत १४ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) विभागात पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनच्या जोडणीचे (Non-Interlocking work) काम सुरू करण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या दरम्यान रेल्वे वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
आतापर्यंत किती गाड्या रद्द?रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजनांदगाव-कलमना हा विभाग अत्यंत गजबजलेला असून येथे गाड्यांचा वेग आणि क्षमता वाढवण्यासाठी तिसरी लाईन जोडणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक विस्कळीत होणार असली तरी भविष्यात रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. सध्या ऐन प्रवासाच्या दिवसांत गाड्या रद्द झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नियोजन कोलमडणार आहे.
यामुळे रद्द करण्यात येणाऱ्या १४ गाड्यांमध्ये प्रामुख्याने लोकल पॅसेंजर आणि मेमू (MEMU) गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या २४ जानेवारी ते ३१ जानेवारी या ८ दिवसांच्या कालावधीत धावणार नाहीत.
तसेच काही गाड्या त्यांच्या पूर्ण मार्गावर न धावता अर्ध्यावरच थांबवल्या जातील. ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसेल. तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान धावणाऱ्या सर्व डेमू (DEMU) गाड्या या प्रवासाच्या मध्यभागी थांबवल्या जातील. तर बालाघाट ते तिरोडी दरम्यानच्या डेमू गाड्या देखील त्यांच्या शेवटच्या स्थानकापर्यंत पोहोचणार नाहीत.
या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपवर आपल्या ट्रेनची खात्री करून घ्यावी. रद्द केलेल्या गाड्यांच्या जागी प्रवाशांना पर्यायी खासगी वाहनांचा किंवा बसचा आधार घ्यावा लागणार आहे.