बॉलिवूडमध्ये एक अत्यंत लोकप्रिय मल्टीस्टारर चित्रपट, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी एका कलाकारानेच चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता, कारण ती कथा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजेच विवाहबाह्य संबंधावर आधारित होती.
2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'कभी अलविदा ना कहना' असं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. विवाहित जोडप्यांवर आधारित या चित्रपटाची कथा होती, जे एकमेकांसोबत खुश नसतात. त्यानंतर चित्रपटात शाहरुख आणि रानीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतं.
दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं होतं की, त्याच्या कथेचा सर्वांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. प्रिती झिंटा ही गोष्ट स्वीकारायलाच तयार नव्हती की शाहरुखची भूमिका तिच्यासारखी महिलेची फसवणूक करेल.
करण जोहरने पुढे असाही खुलासा केला की अभिषेक बच्चनसुद्धा एका सीनदरम्यान ढसाढसा रडला होता. तो अत्यंत भावनिक सीन होता. मला असं जाणवलं की प्रिती झिंटापासून अभिषेक बच्चनपर्यंत प्रत्येकजण त्यांच्या मनात अनेक चढउतारांमधून जात होता.
या चित्रपटात मूळ वास्तवाबद्दल आणि अत्यंत भावनिक वास्तवाबद्दल बोललं गेलं होतं. अशा गोष्टी ज्यातून लोक जातात, पण त्याबद्दल सहसा बोलत नाहीत. तो अनुभव खूपच अशांत करणारा होता, असं करण पुढे म्हणाला.