Bollywood Actress : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी अनेक कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. पण असे काही कलाकार आहेत, ज्यांना इंटस्ट्रीमध्ये येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. या ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेत आज उच्चवर्गापासून मध्यमवर्ग आणि सामान्य कुटुंबांतील अनेक तरुणी आपले नशीब आजमावण्यासाठी येत आहेत. मात्र, हा करिअरचा मार्ग सर्वांसाठी सोपा नसतो. आजही अनेक कुटुंबे आपल्या घरातील मुलींना बॉलिवूड किंवा ओटीटीसारख्या जगात जाण्याची परवानगी देत नाहीत. अशाच कठीण परिस्थितीचा सामना अभिनेत्री सयानी गुप्ता हिनेही केला आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी आणि दरमहा भरघोस पगार मिळत असतानाही सयानी गुप्ताने अभिनयाच्या स्वप्नासाठी तो सुरक्षित मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या या निर्णयाला सर्वात आधी विरोध केला तो तिच्या आईने. एका मुलाखतीत सयानी गुप्ताने स्वतः सांगितले की तिच्या आईने तिचे संगोपन एकटीने केले आहे. त्यामुळे मुलगी सुरक्षित राहावी हाच तिचा आईचा कायमचा प्रयत्न होता.
जेव्हा सयानी गुप्ताने पुण्यातील एफटीआयआय मध्ये अभिनयाचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिची आई प्रचंड नाराज झाली. अभिनय क्षेत्रात जाण्यापासून तिला रोखण्यासाठी आईने अगदी टोकाची भूमिका घेतली. सयानी गुप्ताने सांगितले की तिच्या आईने तिला धमकी दिली होती, ‘जर तू अभिनयासाठी गेलीस तर मी माझी नस कापून घेईन.’ तिच्या आईला अभिनयाचा व्यवसाय चुकीचा वाटत होता. इतकेच नाही तर ती अभिनेत्रींची तुलना वेश्यांशीही करत होती.
चित्रपट पाहून आईनेच केलं कौतुक
इतक्या तीव्र विरोधाला सामोरे जात असतानाही सयानी गुप्ताने आपले स्वप्न सोडले नाही आणि ती एफटीआयआयमध्ये दाखल झाली. तिथे गेल्यानंतर तिच्या नशिबाने कलाटणी घेतली. संस्थेत अनुभवी कलाकारांची कमतरता असल्याने तिला लवकरच काम मिळू लागले. काहीच काळात तिला पाच विद्यार्थी चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. त्यापैकी तीन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिच्या आईचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला.
View this post on Instagram
एका चित्रपटाचे काम पाहिल्यानंतर तिच्या आईने तिचे कौतुकही केले. सयानी गुप्ताने सांगितले की तिच्या आईने तिला म्हटले, ‘जर तुला पुढची दोन वर्षे हेच करायचे असेल, तर तू करू शकतेस.’ हा क्षण सयानी गुप्तासाठी खूप भावनिक आणि दिलासा देणारा होता. आज सयानी गुप्ता ‘जॉली एलएलबी 2’, ‘आर्टिकल 15’, ‘पगलैट’ आणि ‘एक्सोन’ यांसारख्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.