टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाची घोषणा, विकेटटेकर गोलंदाजाला काढलं बाहेर
GH News January 23, 2026 09:11 PM

Pakistan Squad For T20I Series vs Australia: पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला समर्थन दिल्याने तशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, गुपचूपपणे संघ आयसीसीकडे सोपवला असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आता खरं काय आणि खोटं काय? हे लवकरच कळेल. असं असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. या संघात 16 सदस्यांचा समावेश आहे. ही मालिका लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. या मालिकेला 29 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी निवडलेला संघच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल अशी शक्यता आहे. पण यात एक नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यात स्टार गोलंदाजाचा समावेश नाही. त्याने बिग बॅश लीग स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज हारिस रऊफची निवड केलेली नाही. हारिस रऊफ पाकिस्तानच्या टी20 संघातील महत्त्वाच्या गोलंदाजापैकी एक आहे. पण त्याला संघातून डावलण्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. कारण त्याचा बिग बॅश लीग स्पर्धेतील फॉर्म पाहता त्याला संघात जागा मिळेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. त्याने बिग बॅश लीग स्पर्धेतील 11 सामन्यात 20 विकेट काढल्या. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव आहे. असं असून त्याचं नाव डावलण्यात आलं आहे. दुसरीकडे, या संघात बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांची निवड केली आहे. त्यांना श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेतून वगळण्यात आलं होतं. त्यांना संघात स्थान दिल्याने पाकिस्तानच्या फलंदाजी आणि गोलंदाजीची बाजू भक्कम झाली आहे.

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी निवडलेला संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापैकी एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याची जागा दुसरा खेळाडू घेईल. आता टी20 वर्ल्डकप संघात याच खेळाडूंना संधी मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मालिकेत बाबर आझम फेल गेला तर त्यालाही संघातून डावललं जाऊ शकतं.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी पाकिस्तान संघ : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान (उम्मन खान, शादब खान)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.