Pune ZP Election : महापालिका निवडणुकीत विश्वासघात, आता आठवलेंनी घेतला मोठा निर्णय; भाजप-शिंदेंना झटका...
Sarkarnama January 23, 2026 10:45 PM

BJP setback Pune : महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात विचार न केल्याने केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपला विश्वासघात झाल्याचे ते म्हणाले होते. पुण्यासह काही महापालिकांमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार कमळ या चिन्हावर लढले. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आठवलेंच्या पक्षाने महायुतीला जोरदार झटका दिला आहे.

रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने पुणे जिल्ह्याच्या थेट शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्याचे समोर आले आहे. या आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी महाआघाडी पाहायला मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. गुरूवारी जुन्नर तालुक्यात झालेल्या मेळाव्याबाबतची माहिती त्यांनी या पोस्टमध्ये दिली आहे. राष्ट्रवादीची एकजूट आणि महाआघाडीची वज्रमूठ; बालेकिल्ला राखण्यासाठी जुन्नरमध्ये विजयाचा निर्धार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Narendra Modi : PM मोदींची बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त खास पोस्ट; दोन फोटो अन् म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी...

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित जाहीर मेळावा उत्साहात पार पडला. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जुन्नरच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादी विचारप्रवाह एकाच ध्येयाने एकत्रितपणे सामोरे जात आहेत. या ताकदीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आर.पी.आय. (आठवले गट) या मित्रपक्षांची खंबीर साथ लाभल्यामुळे महाआघाडीची ही वज्रमूठ आता अधिकच अभेद्य झाल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

आता वेळ आली आहे घड्याळाचा गजर करून आणि मशालीच्या प्रकाशात जुन्नरचा सर्वांगीण कायापालट करण्याची. हा बालेकिल्ला राखण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो असून विजयाचा संकल्प निश्चित केला आहे, असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अद्याप आठवले गटाकडून महाआघाडीबाबत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, कोल्हे यांच्या पोस्टमुळे आठवलेंचा पक्ष किमान पुणे जिल्ह्यात पवारांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mayor reservation : महापौरपदाची सोडत जाहीर; SC, ST, OBC साठी कोणत्या महापालिकेत आरक्षण? वाचा संपूर्ण यादी...

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत आठवलेंचा पक्ष भाजपसोबत होता. त्यांच्या पक्षाच्या वाट्याला एकही जागा आली नसली तरी त्यांचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढले आणि निवडूनही आले होते. आता जिल्हा परिषदेत मात्र आठवलेंच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी वेगळा विचार केल्याने जिल्हा परिषदेतही बाजी मारण्याच्या भाजपच्या रणनीतीला काही प्रमाणात हादरा बसला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.