बिग बॅश लीग स्पर्धेच्या प्लेऑफ 2 सामन्यात सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा होबार्ट हरिकन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्सकडून स्टीव्ह स्मिथचं वादळ घोंघावलं. त्याच्या आक्रमक खेळीपुढे होबार्ट हरिकन्सच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आला तेव्हा त्याच्यासोबत बाबर आझम नव्हता. कारण पाकिस्तान संघाच्या नॅशनल ड्युटीचं कारण देत तो या स्पर्धेतून बाहेर गेला. तसा त्याचा फॉर्म पाहता त्याला आरामच दिला गेला असता. असं असताना स्मिथसोबत फलंदाजीला डॅनियल ह्युज आला. या जोडीने सावध खेळी केली. 27 धावांवर डॅनियल ह्यूजच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला. स्टीव्ह स्मिथने 43 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 9 चौकार आणि एक षटकार मारला.
स्टीव्ह स्मिथच्या खेळीच्या जोरावर सिडनी सिक्सर्सने 20 षटकात 8 गडी गमवून 198 धावा केल्या. तसेच विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान होबार्ट हरिकन्सला गाठता आलं नाही. होबार्टचा संपूर्ण संघ 17.2 षटकात सर्व गडी गमवून 141 धावा करू शकला. सिडनी सिक्सर्सने हा सामना 57 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. होबार्टचा संघ सिडनी सिक्सर्या गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. बेन ड्वॉर्शियसने 26 धावा देत 3 गडी बाद केले. तर मिचेल स्टार्कने 4 षटकात 29 धावा देत 2 गडी बाद केले. तर शॉन एबट आणि जोएल डेविड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जॅक एडवर्ड्सला एक विकेट मिळाली.
स्टीव्ह स्मिथची जबरदस्त कामगिरीस्टीव्ह स्मिथ बिग बॅश लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या जोरावरच सिडनी सिक्सर्सने काही सामन्यात विजय मिळवला. त्याने पाच सामन्यात 275 धावा काढल्या. यावेळी त्याची बॅटिंग सरासरी ही 68.75 आहे. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली. तसेच 13 षटकार आणि 22 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 160 पेक्षा जास्त होता. या पर्वात सिडनी सिक्सर्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आता अंतिम फेरीत सिडनी सिक्सर्सचा सामना पर्थ स्कॉर्चर्सशी होणार आहे. प्लेऑफ 1 मध्ये पर्थ स्कॉर्चर्सने सिडनीला 48 धावांनी पराभूत केलं होतं.