महापालिका निवडणुकीमध्ये सहर शेख यांना एमआयएमकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्या एमआयएमच्या तिकीटावर विजयी देखील झाल्या, दरम्यान विजयी झाल्यानंतर त्यांनी कैसे हराया? म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांनी एक वादग्रस्त विधान देखील केलं होतं, मुब्राला हिरवा करायचं आहे, अशा अशयाचंं ते विधान होतं. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. या वक्तव्या प्रकरणात पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस देखील बजावली होती. त्यानंतर आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आज सहर शेख यांच्यासह मुब्र्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू असं जलील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले जलील?
पक्ष पूर्णपणे सहर शेख यांच्या पाठिशी उभा आहे. तुम्ही जर पोलीस येणार आहेत, पोलीस आले आहेत, असं म्हणून सहर शेख यांच्यावर जर दबाव निर्माण करत असाल तर आजपासून सहर शेख यांचं हे विधान इथेच संपलं आहे. मी स्टेटमेंट देतो, तुम्ही सहर शेख यांना एक छोटी मुलगी समजून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतात, पण आता मी म्हणतो, माझ्याविरोधात काय कारवाई करायची ती करा, असा इशाराच यावेळी इम्तियाज जलील यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना दिला आहे.
दरम्यान एक पत्र व्हायरल झालं आहे, जे पत्र किरीट सोमय्या यांना पोलिसांनी पाठवलेल्या पत्राची कॉपी आहे, ज्यामध्ये पोलिसांनी असं म्हटलं आहे की, सहर शेख यांना पाठवलेल्या नोटीशीनंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन एक स्टेटमेंट दिलं आहे. या स्टेटमेंटमध्ये आपल्या वक्तव्याबद्दल सहर यांनी माफी मागितली आहे, असा प्रश्नही यावेळी जलील यांना विचारण्यात आला.
या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना जलील यांनी मोठं विधान केलं आहे. मी या प्रकरणात सहर शेख यांना प्रश्न विचारला होता, आणि मी त्यांना हे देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारे आपल्याला माफी मागायची नाहीये. आणि त्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मुब्राला हिरवं करायचं आहे, जसं की नाशिकमध्ये गिरीश महाजन हे हिरव्याला कापण्याची तयारी करत होते, महाज यांना नाशिकमध्ये हिरवा रंगच नको होता. मात्र त्यावेळी संपूर्ण नाशिक एकवटलं आणि म्हणाले नाही साहेब आम्हाला हिरवा रंग वाचवायचा आहे, आम्हाला झाडं वाचवायचे आहेत. मग तुम्ही सहर शेख यांच्या या विधानाला या दृष्ट्रीकोणातून का पहात नाहीत? तुम्हाला तर हिरवा हा शब्द असा लागला जसं की तो काही दहशतवादी शब्द आहे, असं यावेळी जलील यांनी म्हटलं आहे.