भारताने 23 जानेवारीला रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20I सामन्यात धुव्वा उडवला. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहजासहजी पूर्ण केलं. टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये 209 धावा केल्या. भारताने यासह न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. भारताने यासह मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली.
संजू सॅमसन (6) आणि अभिषेक शर्मा (0) आऊट झाल्याने टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली होती. मात्र इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या तिघांनी जोरदार फटकेबाजी भारताला करुन विजय मिळवून दिलं. यासह रायपूरमधील या सामन्यात 5 विक्रम झाले. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध वेगवान अर्धशतकइशान किशन याने रायपूरमध्ये वेगवान अर्धशतक झळकावलं. इशानने 76 धावांची खेळी केली. इशानने या दरम्यान अवघ्या 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. इशानने यासह अभिषेक शर्मा याचा न्यूझीलंड विरुद्ध टी 20I क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम मोडीत काढला. इशानने नागपूरमधील पहिल्या टी 20I सामन्यात 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
इशान पहिलाच भारतीय फलंदाजसंजू सॅमसन याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावल्यानंतर इशान किशन मैदानात आला. इशानने पावर प्लेमधील शेवटच्या (सहाव्या) ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. इशान यासह पावरप्लेमध्ये अर्धशतक करणारा पहिला नॉन ओपनर ठरला.
200 पेक्षा अधिक धावांचा वेगवान पाठलागभारताने न्यूझीलंड विरुद्ध 28 चेंडूआधीच 209 धावांचं आव्हान पूर्ण केलं. यासह भारत 200 पेक्षा अधिक धावांचा वेगवान यशस्वी पाठलाग करणारा पहिलाच संघ ठरला. भारताने यासह पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. पाकिस्तानने 205 धावांचं आव्हान हे 24 चेंडूंआधी पूर्ण केलं होतं.
झॅक फॉउल्क्सची धुलाईभारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या झॅक फॉउल्क्स या गोलंदाजाची धुलाई केली. भारतीय गोलंदाजांनी झॅकच्या 3 ओव्हरमध्ये 67 धावा ठोकल्या. झॅक यासह टी 20I क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा देणारा पहिला गोलंदाज ठरला. झॅकने याबाबत बेन व्हीलर याला मागे टाकलं. व्हीलरने 2018 साली एका सामन्यात 64 धावा दिल्या होत्या.
अर्शदीप सिंहसोबत काय झालं?अर्शदीप सिंह भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. अर्शदीपने आतापर्यंत बहुतांश वेळा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत भारताला अप्रतिम सुरुवात मिळवून दिलीय. मात्र अर्शदीपने रायपूरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा लुटवल्या. अर्शदीप यासह भारताकडून पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा लुटवणारा पहिला गोलंदाज ठरला.