Sangli ZP Election : चिंचणी मायाक्का यात्रेमुळे सांगली जिल्हा परिषद मतदान पुढे जाणार? निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
esakal January 26, 2026 04:45 AM

Sangli Maharashtra local body elections : कर्नाटकातील चिंचणी येथील मायाक्का देवीची यात्रा ५ फेब्रुवारीस आहे. याच दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान आहे; मात्र यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक जात असल्याने मतदान दोन दिवस पुढे ढकलावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ती बारावीच्या परीक्षेमुळे आयोगाने फेटाळली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीस मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुरू आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीचे मतदान गुरुवारी (ता. ५) होणार आहे; मात्र हा दिवस मायाक्का चिंचणी येथील यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी जातात.

मायाक्का देवीच्या यात्रेचा मुख्य विधी ५ फेब्रुवारीला असून, या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी मतदान झाल्यास त्यावर परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. यात्रेनंतर दोन दिवसांनी भाविक गावाकडे परततात. त्यामुळे किमान दोन दिवस मतदान पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

निवडणूक आयोगाने तीन दिवस उशिरा म्हणजे आठ फेब्रुवारीला मतदानघेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता.

Sangli ZP Election : सांगलीत झेडपीचे वातावरण तापलं उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला, गाडी जाळली; पहाटे ३ वाजता जयंत पाटील घटनास्थळी

सर्वांचे अहवाल आयोगाला पाठविण्यात आले; मात्र दहा फेब्रुवारीपासून बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी ८ रोजी परीक्षा केंद्र शाळांच्या ताब्यात देणे अनिवार्य आहे. त्यामुळे मतदान पुढे ढकलण्याची मागणी अमान्य केली. याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी काढले आहे. त्यामुळे आता पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार गुरुवारी (ता. ५) मतदान आणि शनिवारी (ता. ७) मतमोजणी होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.