Malegaon Municipal Corporation : मालेगाव मनपाचा सत्तेचा पेच सुटणार? सेक्युलर फ्रंटची शिवसेनेला उपमहापौरपदाची ऑफर!
esakal January 26, 2026 06:45 AM

मालेगाव: मालेगाव महापालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून, काँग्रेसच्या समर्थनानंतर ४३ हा जादुई आकडा गाठणाऱ्या सेक्युलर फ्रंटने आता अधिक भक्कम बहुमतासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली तीव्र केल्या आहेत.

१८ नगरसेवक असलेल्या शिवसेनेला उपमहापौरपदाची ऑफर देण्यात आली असून, या संभाव्य युतीमुळे शहरातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे आहेत. येथील ८४ सदस्यीय सभागृहात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ३५ जागा जिंकणारा इस्लाम पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून, त्यांनी पाच जागा असलेल्या समाजवादी पार्टीसोबत सेक्युलर फ्रंट स्थापन केली आहे.

बहुमतासाठी केवळ तीन जागांची गरज असताना काँग्रेसने पाठिंबा दिल्याने सत्तेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी अधिक सुरक्षित बहुमतासाठी आता शिवसेनेसोबत बोलणी सुरू आहे. चर्चेच्या तीन ते चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून, अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत शिक्षणमंत्री दादा भुसे आणि इस्लाम पक्षाचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख घेणार आहेत.

सुरुवातीला आसिफ शेख यांनी काँग्रेस व एमआयएमकडे बिनशर्त पाठिंब्याची मागणी केली होती. काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली असली, तरी २१ जागा जिंकणारा एमआयएम मात्र विरोधी बाकावर बसण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महानगरपालिकेच्या सत्तेचे गणित बसवताना शिवसेना नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिली आहे. या वृत्ताला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. संजय दुसाने यांनी दुजोरा दिला असून, सत्तेत सहभागी होण्याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे घेणार असल्याचे सांगितले.

Dharashiv News: 'राणा पाटलांच्या बळाला तुम्ही बळी पडला, कार्यकर्त्यांनी साळवींना सुनावलं | Rajan Salvi | Sakal News

शिवसेनेच्या गटनेत्याची मंगळवारी निवड

इस्लाम पक्षाला महापौरपद, शिवसेनेला उपमहापौरपद आणि समाजवादी पक्षाला स्थायी समिती सभापतिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून अद्याप ठोस निर्णय आला नसल्याचे फ्रंटचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेत्याची निवड मंगळवारी (ता. २७) होणार असून, या पदावर माजी उपमहापौर नीलेश आहेर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.