नवी मुंबईत सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
esakal January 26, 2026 07:45 AM

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऐरोली आणि पनवेलमध्ये शुक्रवारी (ता. २३) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांचे दागिने लुटल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी रात्री चेन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी अवघ्या १० मिनिटांमध्ये खारघरमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील दोन लाखांचे मंगळसूत्र खेचून पलायन केले होते. लुटारूंच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नवी मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पहिली घटना शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ऐरोली सेक्टर-३ मधील नवीन ब्रिजखालील विभाग मैदान रोडवर घडली. अल्पना पारोही (वय ६५) या मंदिरात पूजा करून सेक्टर-२० येथील घराकडे परतत होत्या. या वेळी हेल्मेट घालून आलेल्या एका लुटारूने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यानंतर लुटारूने त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची ९० हजारांची सोन्याची चेन हिसकावून पलायन केले. या झटापटीत अल्पना या किरकोळ जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

दुसरी घटना त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील पुष्पक नगर परिसरात घडली. भंगारपाडा येथे राहणाऱ्या मंजुळा दमडे (वय ५५) या पारगाव येथून पायी घरी जात असताना, पाठीमागून आलेल्या एका लुटारूने त्यांना जोरात धक्का दिला. धक्क्यामुळे मंजुळा खाली पडल्यानंतर, लुटारूने संधी साधून त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅमचे ६० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. जमिनीवर पडल्यामुळे मंजुळा यांच्या हाताला आणि मानेला दुखापत झाली आहे. याप्रकरणी त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.